महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या समाधीस्थळ परिसर विकास आराखडा तयार करण्याचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निर्देश…
समाधीस्थळ परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार : उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची ग्वाही…
मुंबई दि.५ : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई महाराज यांची राजगडाच्या पायथ्याशी समाधी असून या समाधी परिसराचा विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या परिसराची पाहणी करावी आणि त्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परिषद सभापती तथा छत्रपती महाराणी सईबाई राणीसाहेब महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज दिले.
या समाधी परिसर विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांनी यावेळी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई महाराज यांच्या राजगड पायथ्याशी असलेल्या समाधी स्थळ विकास करण्यासाठी विधान परिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, सहकारमंत्री ना.बाळासाहेब पाटील, आ.संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद सचिव म.मु.काज यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि छत्रपती महाराणी सईबाई महाराज ट्रस्ट तर्फे डॉ.दामोदर मगदूम, नानासाहेब धुमाळ, हेमंतराव नाईक निंबाळकर, युवराज निंबाळकर, प्रदीप मरळ, करणसिंह बांदल, अनिकेत कोंडे उपस्थित होते, तसेच व्ही सी द्वारे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हेदेखील सदर बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा फार मोठा इतिहास लाभला असून हे गडकिल्ले दुर्लक्षित होऊ नयेत यासाठी त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे साहेब यांनी घेतला आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. या समाधीस्थळ व परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह जलसंपदा, भूमी अभिलेख, पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी यावेळी दिले.
समाधीस्थळ व परिसराच्या विकासासाठी निधी देणार : उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचा विकास करण्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर केला जाईल. महाराष्ट्राचा अभिमान, अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी यावेळी दिली. या आराखड्यामध्ये बंधारा आणि त्यावरील घाट विकसित करण्याच्या बाबींचा समावेश करतानाच गुंजवणी नदीच्या उगमाजवळच्या परिसराचे महत्त्व ओळखून त्याचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. समाधीस्थळ परिसराच्या विकासाचे काम हे दोन टप्प्यात करण्यात येईल, पहिल्या टप्प्यात झालेल्या कामानंतर पुढील टप्प्यांमधील कामे केली जातील असेही उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सांगितले.
यावेळी राजगडाच्या पायथ्याशी महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाच्या अनुषंगाने श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज स्मारक समिती ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.