श्रीमंत सईबाई राणीसाहेब स्मारकाच्या पाल गावास पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण दि ५ ( फलटण टुडे वृत्तसेवा ): 
पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात पाल या गावामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या प्रथम पत्नी व छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती सौ. सईबाई राणीसाहेब भोसले यांची समाधी आहे. गेले बरेच वर्षे हा समाधी परिसर दुर्लक्षित झालेला होता. ह्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती सौ. सईबाई राणीसाहेब भोसले यांच्या स्मारकाच्या माध्यमातून पाल गावचा व परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

पाल, ता. वेल्हे, जि. पुणे येथे श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब भोसले यांच्या समाधी स्मारकाचे भूमिपूजन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अरविंद पासलकर, पाल गावचे सरपंच गोरख शिर्के, कुलदीप कोंडे, बापुसाहेब धुमाळ, करणसिंह बांदल, अण्णा देशमाने, दत्ताजी नलावडे, प्रदिप मरळ, सौरभ आमराळे, अमोल पाटणकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांची स्मारक आधी का केले नाही ? याच्या खोलात जाण्यात आता काहीही उपयोग नाही. छत्रपती सईबाई राणीसाहेबांचा इतिहास चार ओळींच्या वर का लिहला गेला नाही ? या बाबत माझ्या मनामघ्ये कायम खंत राहिली आहे. सईबाई राणीसाहेबांच्या समाधीच्या स्मारकाच्या बाबतीत जी काही पुढील जबाबदारी आहे, ती आता मी स्वतः उचलली आहे. या गावाला पर्यटन स्थळ म्हणूनच विकसित करण्यासाठी आगामी काळामध्ये पर्यत्न करणार आहे. नुसत समाधी किंवा स्मारक बांधुन उपयोग नाही तर त्याचे संवर्धन करणे सुध्दा गरजेचे आहे, असेही मत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

इतिहासामध्ये दुर्लक्षित झालेल्यांच्या नावामध्ये श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांचे नाव सुध्दा होते. याबाबतची खंत माझ्या मनात होती. फलटणला सुध्दा ऐतिहासिक वारसा आहे. फलटण तालुक्याच्या मुरुम गावामध्ये मल्हारराव होळकर यांचे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे काम हे कायम स्मरणात राहिल. आता पुढील कामासाठी मी तयारीला लागलेलो आहे. श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांची समाधी आता बांधण्यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न करणार आहे. श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांची समाधी बांधण्यासाठी आपण सर्व गावकर्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या बद्दल आभार करत आगामी काळामध्ये गावकऱ्यांची मदत मला गरजेचीच आहे, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांच्या स्मरण दिनानिमित्त आपण सर्व जण एकत्रित आलेलो आहोत. मावळचा इतिहास कुणी वेगळा सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास आणि मावळ्यांचा इतिहास हा वेगळा नसुन एकत्रितपणेच पुढे जात आहे. लहानपणी शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत होतो. इतिहासाच्या खाणाखुणांचे जर आपण जतन केले नाही तर काळाच्या ओघात गडप होण्याची शक्यता आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

साहस, पराक्रम व चारित्र्य संपन्न असा अनन्यसाधारण राजा म्हणून शिवाजी महाराजांची ओळख होती. शत्रु सुध्दा शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर संशय घेवू शकत नव्हता. पुढच्या स्मरण दिनी हे स्मारक पुर्ण झालेले असलेले पाहीजे या पध्दतीने आपण सर्व जण विधानपरिषदेचे श्रीमंत रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली काम करू. श्रीमंत रामराजे एकदा कामाला लागल्यावर काम कसं होत हे निरा देवधरच्या माध्यमातून तुम्हा स्थानिकांना ज्ञात आहे. ज्या काळात शिवाजी महाराजांचे नाव कोणीही राजकारणी घेत नव्हते त्या काळी शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतापगडावर प्राध्यान्याने बसवला. प्रतापगडावर ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांचे स्मारक पाहण्यासाठी लांबुन येत असतात, त्याच प्रमाणे श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांचे स्मारक पाहण्यासाठी पर्यटक येतील, अशी खात्री आम्हा सर्वांना आहे, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.


३६५ व्या पुण्यतिथीनिमित्त आज जे भुमीपुजन झालेले आहे. आता आगामी काळामध्ये नक्कीच स्मारक लवकरात लवकर पुर्णत्वास जाईल यात कसलीही शंका नाही. भविष्यात अनेक पिढ्या येवुन श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांच्या समाधीस्थळी माथा टेकुन जातील, अशी खात्री आम्हा सर्वांना आहे, असे मत नानासाहेब धुमाळ यांनी स्पष्ट केले.


श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब स्मारकाची माहीती प्रास्ताविकात गणेश खुटवड – पाटील यांनी दिली. स्मारकाचे वास्तुरचनाकार अमोल पाटणकर यांचा विशेष सत्कार या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!