फलटण दि.१२ :
फलटण शहरातील वाढती लोकवस्ती विचारात घेऊन येथील रहिवाशांना पुरेशा नागरी सुविधा देताना प्रधान्यक्रम ठरवावा लागत असल्याने शहरात बागबगीचा, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, लॉन, चालण्यासाठी बागेत पदपथ निर्माण करताना विलंब झाला असला तरी आता त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधील शुक्रवार पेठ, शनिनगर येथील आरक्षण क्रमांक ९ मधील बगीचासाठी आरक्षित असणाऱ्या खुल्या जागेत बगीचा, अँपी थिएटर, पदपथ, लॉन, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी वगैरे सुमारे ४३ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भुमिपूजन ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक करण्यात आले, त्यावेळी नगराध्यक्षा सौ.निता मिलिंद नेवसे, नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, नगरसेविका सौ.वैशाली सुधीर अहिवळे, नगरसेविका सौ.वैशाली दादासाहेब चोरमले, मा.उपनगराध्यक्ष संजय मुरलीधर पालकर, मा.उपनगराध्यक्ष नितिनभैय्या रमेशचंद्र भोसलें-पाटील, मा.नगरसेवक चंद्रकांत वामनराव शिंदे, मा.नगरसेवक वस्ताद सलीमभाई शेख यांच्या सह फलटण नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू, प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिक बंधू भगिनी, युवक, युवती व शहरवासीय उपस्थित होते.
*जकात उत्पन्नात भरीव वाढ केल्याचा फायदा अनुदान वाढीसाठी*
फलटण शहर वासीयांच्या समस्या, अपेक्षा, गरजा आपण नगराध्यक्ष झाल्यावर सुमारे ३० वर्षांपूर्वी जाणून घेतल्या त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने प्रयत्नांना मर्यादा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नगर परिषद जकात उत्पन्न ठेकेदारी पद्धतीने वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला, दरम्यान शासनाने जकात रद्द करुन त्या उत्पन्ना इतके अनुदान प्रतिवर्षी १०% वाढीने नगर परिषदांना देण्याची घोषणा केली, त्या दरम्यान ठेक्यामुळे जकात उत्पन्न वाढल्याचा फायदा झाला, नगर परिषदेचे उत्पन्न वाढले, त्याचा फायदा घेऊन अनेक नागरी सुविधा मध्ये सुधारणा केल्याचे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
*मंत्रीपदामुळे शहर विकासाला पुरेसा वेळ देता आला नाही पण दुर्लक्ष नव्हते*
दरम्यान १९९५ मध्ये शेती पाण्याच्या प्रश्नावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विधानसभेत तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने शहर वासीयांप्रमाणे मतदार संघातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जबाबदारी आणि त्याच्या पुर्ततेसाठी मंत्रीपदाची संधी देण्यात आल्याने केवळ मतदार संघ नव्हे संपूर्ण राज्याच्या प्रश्नांची सोडवणूक करावी लागणार असल्याने शहराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले नाही पण पुरेसा वेळ देता न आल्याने अनेक प्रश्न प्रलंबीत राहिले होते, त्यांची सोडवणूक आता टप्प्याटप्प्याने करीत असल्याचे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
*महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना अंतीम टप्यात पूर्णत्वाकडे*
वाढत्या लोकवस्तीसह संपूर्ण शहराच्या नागरी सुविधा पुरेशा असल्या पाहिजेत याला आपण नेहमीच प्राधान्य दिले असून त्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये उपलब्ध करुन घेऊन विविध योजना राबविल्याचे निदर्शनास आणून देत, महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेसाठी सुमारे ८५/९० कोटी रुपये झाले असून सदर योजना अंतीम टप्प्यात पूर्णत्वाकडे जात आहे, त्यातून उपलब्ध होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यातून नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडेल तथापी त्यापेक्षा शहरातील साथ रोगाचे उच्चाटन करण्यास मोठी मदत होणार असल्याचे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
*शहर पाणी पुरवठा योजनेचा विस्तार झाला*
शहर पाणी पुरवठा योजना विस्तारासाठी राज्य शासनाचे माध्यमातून सुमारे ५० कोटी रुपये उपलब्ध झाल्यानंतर सदर काम पूर्ण झाले असून आता उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे, दरम्यान शहर वासीयांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा उपलब्ध झाला आहे. आता जलशुद्धीकरण यंत्रणेतील फिल्टर युनिटची दुरुस्ती देखभाल बाकी आहे, त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे सूतोवाच यावेळी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
*सौर ऊर्जेचा वापर पथदिव्यांसाठी करणार*
शहरातील मुख्य रस्त्यावरील वीज वाहिन्या भुमीगत टाकण्यासाठी विशेष योजना राबविण्यात आली असून उर्वरित वीज वाहिन्या भुमीगत टाकण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, पथ दिव्यांसाठी शासनाची विशेष योजना राबवून कमी खर्चात अधिक प्रकाशाची व्यवस्था करण्याचा हा प्रकल्प शहरात राबविला जात असल्याचे निदर्शनास आणून देत आगामी काळात त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याची योजना विचाराधीन असल्याचे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
*शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा तरुणांनी लाभ घ्यावा*
भुयारी गटार योजनेचे काम सुरु असल्याने शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, त्यातून शहरवासीयांना झालेला त्रास याची आपल्याला कल्पना आहे, तथापी भुयारी गटार योजना शहराच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याने प्राधान्याने त्याची पूर्तता करण्यात येत असून शहरातील रस्त्यांची पुनर्बांधणी व डांबरीकरण कामाला सुरुवात झाली असून लवकरच शहरातील सर्व रस्ते पूर्वीप्रमाणे उत्तम, दर्जेदार, वाहतुकीसाठी उत्तम करण्यात येतील याची ग्वाही ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे, दरम्यान शहरातून २/३ राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने वाढती वाहतूक व विविध राज्यातून येणाऱ्या लोकांमुळे येथे हॉटेल, खाद्यपदार्थ, विविध वाहनांची दुरुस्ती देखभाल, पेट्रोल डिझेल वगैरे इंधन पुरवठा या व्यवसायाची मागणी वाढणार असल्याने तरुणांनी त्याला प्राधान्य देवून आपले व्यवसाय निवडावेत, त्यासाठी तरुणांना पुरेसे सहकार्य, मार्गदर्शन करण्याची ग्वाही ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
*तालुका १००% बागायत, त्याचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योजक बनावे*
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध पाटबंधारे प्रकल्पांची उभारणी करताना खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी पट्ट्याला त्याचा अधिक लाभ मिळाला पाहिजे, यासाठी केलेल्या प्रयत्नातून फलटण तालुका आगामी काळात १००% बागायत होत असून त्याचा लाभ शेती शेतकऱ्यांप्रमाणे उद्योग क्षेत्राला होणार असून तरुणांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगांबरोबर प्रकल्पांची उभारणी करुन स्वतः उद्योजक बनावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाला प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
*शहर विकासाला प्राधान्य*
शनिनगर विकास प्रकल्पाचा एक भाग असलेल्या अँपी थिएटर, बगीचा विकास, पदपथ निर्मिती, लॉन, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी या ४३ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भुमीपूजन व प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ यासाठी उपस्थित राहुन ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी असल्याचे नमूद करीत नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली तर नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती देवून आगामी दोन महिन्यात सदर काम पूर्ण करुन लोकार्पण करण्याचे सूतोवाच केले. या कामाचे ठेकेदार संदीप जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
*शनिनगर बागेचे काम मंजुरीसाठी श्रीमंत रामराजे (महाराजसाहेब), आमदार दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत रघुनाथराजे (बाबा), श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांचे मोठे योगदान*
नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी शनिनगर बागेचे काम प्रत्यक्षात मंजुरीसाठी श्रीमंत रामराजे (महाराजसाहेब), आमदार दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत रघुनाथराजे (बाबा), श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांचे मोठे योगदान लाभल्याचे स्पष्ट केले व शनिनगर बाग विकसित होताना श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) यांचे बहुमोल मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांच्या शुभहस्ते करण्यात आला, दादासाहेब चोरमले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.