फलटण पोलिसांनी चायनीज मांजा विक्री व खरेदी करू नये असे आवाहन करूनही फलटण तालुक्यात सर्रास चायनीज मांजा विक्री व खरेदी होत असल्याचे चित्र पहायला मिळाले असून या चायनीज मांजामुळे एक तरुण जखमी झाला असून त्याच्या गळ्याला 48 ते 50 टाके पडल्याची घटना फलटण येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण शहरातील फलटण लोणंद रोडवर असलेल्या स्मशानभूमी परिसरात चायनीज मांजामुळे एका 35 वर्षांच्या तरुणाचा गळा चिरल्याची घटना घडली असून उमेश हरी चव्हाण असे जखमी तरुणाचे नाव आहे.
दिनांक 12 ऑगस्ट रोजी उमेश हरी चव्हाण ( वय 35, रा.झिरपवाडी ता.फलटण ) वेदांत ट्रेडर्स चे मालक हे दुपारी वडजल गावावरून फलटणकडे येत असताना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फलटण स्मशानभूमी परिसरातुन रोड ने जात असताना उमेश हरी चव्हाण याच्या गळ्याला चायनीज मांजा अडकून त्याचा गळा चिरला. चायनीज मांजामुळे गळा चिरल्यामुळे उमेश पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. काही केल्याने त्याचे रक्त थांबत नव्हते. त्यामुळे त्याला फलटण येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व शस्त्रक्रियेदरम्यान गळ्यावर 48 ते 50 टाके टाकण्यात आले.
शहरासह तालुक्यात चायनिज मांजामुळे मोठ्या प्रमाणात अनेकजण जखमी झाल्याने नागरिकांमधून चिनी मांजा विक्री करणाऱ्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. एकीकडे पोलिसांनी काही दुकानदार यांच्यावर चायनिज मांजा विक्री प्रकरणी कारवाई केली असली तरी शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी चायनीज मांजा विक्री होत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. शहरात अनेक मुख्य वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर व ईतर गर्दीच्या ठिकाणी चायनीज मांजे धोकादायक पणे लोंबत असताना दिसत होते. चायनीज मांजा खरेदी व विक्रीबाबत कायद्याची व कारवाईची भीती दुकानदार व उत्साही तरुणांना नसल्याने तसेच याबाबत पोलिस कारवाई कडकपणे होत नसल्याने सामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.