गेल्या तीन वर्षापासून बांधकाम पूर्ण होऊन ताथवडा येथील नव्याने बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र ची इमारत डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या प्रतिक्षेत असून डॉक्टर नसल्याने या आरोग्य केंद्राअंतर्गत समाविष्ट वीस गावातील ग्रामस्थांची कोरोना काळात ससेहोलपट सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण तालुक्यातील ताथवडा येथे नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आरोग्य सेवा देण्यासाठी गेले तीन वर्षांपूर्वीपासून सज्ज असून अद्याप वैद्यकीय अधिकारीच नसल्याने ग्रामस्थांना दवाखान्याचा वापर करून उपचार घेता येत नाहीत, ताथवडा येथे जानेवारी 2013 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते.
शहराच्या दक्षिणेकडे संतोष गड डोंगराच्या पायथ्याला भव्य अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार करण्यात आलेली असून या आरोग्य केंद्र अंतर्गत ताथवडा, तरडफ,दालवडी, ढवळ,वाठार निंबाळकर ही उपकेंद्रे समाविष्ट केली आहेत तर ताथवडा, झडकबाईचीवाडी, मानेवाडी,पीराचीचीवाडी, ढवळ, वाखरी, शेरेचीवाडी, तरडफ,उपळवे, वेळोशी, दालवडी ,जाधवनगर, सावंतवाडी, दऱ्याचीवाडी, वाठार निंबाळकर, गोळेवाडी, मिरेवाडी, गोळेवाडी, जोरगाव ,खडकी ही 20 गावे समाविष्ट केली आहेत.
ताथवडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मुळे 2011 च्या जनगणनेनुसार ढवळ उपकेंद्र अंतर्गत तीन गावांमध्ये 6685 तरडफ उपकेंद्र मधील तीन गावातील 5145 नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या दालवडी उपकेंद्रां मधील पाच गावातील 3839 वाठार निंबाळकर उपकेंद्र मधील पाच गावातील 5712 ग्रामस्थांना तर ताथवडा उपकेंद्रातील चार गावातील 3151 ग्रामस्थांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.
ताथवडा प्राथमिक आरोग्य केंद्र या दवाखान्यात या परिसरातील 24 हजार 612 लोकसंख्या समाविष्ट करण्यात आली आहे,सदरची लोकसंख्या ही 2011 सालची असून सुमारे 10000 इतकी वाढ या मध्ये झाली असून या आरोग्य केंद्राचा या नागरिकांना उपयोग होणार आहे, तसेच फलटण पुसेगाव रस्त्यावरील ताथवडा घाटातील वारंवार होणाऱ्या अपघातामध्ये जखमी वाहनचालक तसेच वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ग्रामस्थांना तातडीची मदत मिळणार आहे, सध्या दवाखाना इमारत गत तीन वर्षापासून तयार असून डॉक्टर व इतर कर्मचारी तसेच आरोग्य सेवा साहित्य नसलेले इमारत बंद अवस्थेत आहे.
याबाबत फलटण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रांत पोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाकडे डॉक्टर इतर आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय साहित्य मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच या ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाईल अशी प्रतिक्रिया डॉक्टर पोटे यांनी दिली.
मागील दोन वर्षात कोरोना महामारीत सक्षम आरोग्य व्यवस्थेचे महत्व अजूनही न कळलेल्या प्रशासनाने स्वतःकडील उपलब्ध आरोग्य व्यवस्थाच मोडकळीस आणली असल्याचे चित्र एकंदरीतच दिसत आहे. येणाऱ्या काळात ताथवडा येथील नव्याने बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र ची इमारत डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ पावले उचलली जावीत अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया १.
(ताथवडा गाव फलटण शहरापासून 21 किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या सीमेवर संतोषगड डॉगराच्या पायथ्याशी वसलेले असून कायम दुष्काळी म्हणून ओळखले जाणाऱ्या गावात शासनाने अध्यावत दवाखान्याची इमारत बांधली आहे , मात्र प्रत्यक्षात दवाखाना सुरू झाला नाही तो लवकर सुरू होऊन आमच्या गावासह इतर गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांना उपचार मिळावेत अशी मागणी ताथवडा येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद जाधव यांनी केली आहे.)
प्रतिक्रिया २.
(ताथवडा उपकेंद्रातील समाविष्ट सर्वच गावातील ग्रामस्थांना अगदी सर्दी खोकला उलट्या-जुलाब सारखे किरकोळ आजारासाठी ही आर्थिक परिस्थिती नसताना ही फलटणला जावे लागते, येथील शासकीय दवाखाना सुरू झाल्यास तातडीची उपचार व आरोग्य सेवा मोफत उपलब्ध होईल अशी प्रतिक्रिया पिराचीवाडीचे सरपंच दिपकराव सावंत यांनी बोलताना दिली.)
प्रतिक्रिया ३.
( याबाबत बोलताना ढवळ गावचे आप्पासाहेब लोखंडे म्हणाले ताथवडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत वीस गावातील सुमारे 1000 होऊन अधिक ग्रामस्थ व नागरिकांना गत दीड वर्षात कोरोना हजार होऊन गेलेला आहे ,तर आजही या वीस गावांमध्ये आठवड्याला चार पाच रुग्ण पूर्ण बाधीत आढळून येत असून या कोरोना बाधित ग्रामस्थांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागल्याने हजारो लाखो रुपयांचे आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागला आहे ,विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तालुक्यात सर्वात मोठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ताथवडा येथे उभी राहिली असून या ठिकाणी लवकरात लवकर उपचार मिळावेत अशी प्रतिक्रिया लोखंडे यांनी दिली.)