फलटण दि.१o :
आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा बाळगण्याला कोणीही थांबवू शकत नाही, असं म्हटलं जातं. हे सूत्र लक्षात ठेवून शेती आणि शेतीशी निगडित उद्योग क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग केले जात आहेत. अनेक शेतकरी कल्पनाशक्ती वापरून चांगली शेती व त्यातून कमाई करत आहेत. यापैकीच एक प्रगतशील शेतकरी म्हणजे श्री.रणजितभाऊ रामचंद्र निंबाळकर.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय बारामती येथील चतुर्थ वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या नेहा जालिंदर शिंदे यांनी विंचुर्णी येथील श्री.रणजीतभाऊ निंबाळकर यांच्या यशाचा आढावा घेतला आहे.
विंचुर्णी हा तसा पाणी टंचाई मध्ये येणारा भाग. यामध्ये त्यांनी धाडस करून आपल्या जमिनीमध्ये शेती विषयक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून यशस्वीरीत्या कोणते पीक येऊ शकेल हे पाहिले. नैसर्गिक परिस्थिती व शेतीविषयक तंत्रज्ञान यांचे अभ्यासानंतर त्यांनी डाळिंब हे पीक घ्यायचे ठरवले या पिकास कमी पाण्याची आवश्यकता असून खडकाळ जमिनीमध्ये चांगल्याप्रकारे येऊ शकत असल्याने त्यांनी याची निवड केली. त्याच प्रकारे फलटण मार्केट व सासवड, पुणे अशा मोठ्या बाजारपेठा जवळच उपलब्ध आहेत म्हणून त्यांनी ३ एकर शेतीमध्ये भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. त्यामध्ये ९०० झाडे असून एका झाडाला प्रत्येकी सात ते आठ किलो डाळिंब अशाप्रकारे एकूण उत्पन्न सात टन मिळाले सरासरी दर प्रति किलो ३० रुपये मिळून २,१०,००० झाले. पुढील दर वर्षी झाडांचा विस्तार होऊन प्रति झाड २० किलो उत्पन्न मिळून एकूण १८ टन व दर सरासरी ३० ते ३५ रुपये प्रति किलोने ६,००,००० रुपये झाले तसेच मशागत, छाटणी, खते, औषधे, मजुरी, वाहतूक इत्यादी खर्च २,४०,०००/- आला असून निव्वळ नफा ३,६०,०००/- तीन एकराचे मिळाले.
चांगले उत्पन्न बघून श्री.रणजीतभाऊ निंबाळकर यांनी दहा एकर शेतीमध्ये डाळिंब उत्पादन घेण्याचे निश्चित केले व त्यासाठी एक करोड लिटरचे शेततळे देखील तयार केले व पाण्याची बचत आणि पिकाला योग्य पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचनाची देखील सोय केली रसायनविरहित नैसर्गिक शेती हे ध्येय मनात ठेवून त्यांनी स्वनिर्मित गांडूळ खत, जीवामृत, जैविक खते इत्यादीचा वापर केला आणि बाहेरून रोप विकत घेण्यापेक्षा पिकांमध्ये स्वतः गुटी कलम करून लागवड केली आहे.
या सर्व यशस्वी प्रकल्पांमुळे ते आसपासच्या गावांमध्ये देखील ओळखले जाऊ लागले आहेत व ते इतर शेतकरी मित्रांना यशस्वीरित्या शेती करण्यासाठी मार्गदर्शन देखील करत आहेत.
श्री रणजीतभाऊ निंबाळकर, सौ उज्ज्वला निंबाळकर सौ सुनिता कदम कु नेहा शिंदे व इतर शेतकरी उपस्थित होते.