फलटण दि. १० :
सरडे, ता. फलटण या छोट्या गावातील प्रविण जाधव हा खेळाडू धनुर्विद्या या खेळ प्रकारात ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतो, उपांत्य फेरीपर्यंत मजल मारुन जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करतो ही समस्त फलटण तालुका वासीयांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणला ऑलिंपिक खेळाडू प्रवीण जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही योग्य मार्गदर्शन व अचूक प्रशिक्षण मिळाल्यामुळे प्रविणला फलटण तालुक्यातील पहिला ऑलिंपिक खेळाडू होण्याचा मान मिळाला. त्यांच्या आई वडिलांचे आशिर्वाद व गुरु विकास भुजबळ यांचे मार्गदर्शन यामुळे प्रविण जाधव यांची निवड बालेवाडी, पुणे येथील क्रिडा प्रबोधिनी मध्ये निवड झाली व त्यांच्या अथक परिश्रमाने आज हा बहुमान आपल्या तालुक्याला मिळत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
ऑलिंपिक वीर प्रविण जाधव यांच्या सदिच्छा भेटीमुळे अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण मधील युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे नवीन खेळाडू तयार करण्यास याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी विविध खेळांमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात, तसेच बरेचशे विद्यार्थी प्रत्येक वर्षी विद्यापिठ संघाचे प्रतिनिधित्व करत असतात, अशा विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देवून घडविले तर उत्तम खेळाडू घडतील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी या गोष्टी असतातच, अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच खेळांचे जर या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण लाभले तर आपण उत्तम अभियंते, संशोधक, उद्योजक यांच्या बरोबरीने उत्तम खेळाडू घडवू असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्तम संधी निर्माण करुन दिल्या जातात व त्यांच्या कडून उत्तम कामगिरी करुन घेण्यासाठी योग्य दिशा देवून सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी यावेळी दिली.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय विकास समिती सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शिरिष दोशी, फलटण एज्युकेशन सोसायटी प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.