फलटण प्रतिनिधी – येथील पिंप्रद येथे कोरोनाच्या नियमांना हरताळ फासत जैन सोशल ग्रुप चा पद्ग्रहन समारंभ सम्पन्न झाला आहे. नेहमीसारखे प्रशासनाने मात्र या सोहळ्याकडे सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात या विशेष सूट देऊन आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येताना प्रशासनाला सामान्य नागरिकांवर कठोर निर्बंध घालावे लागत आहेत. तरीही सातारा, कराड , फलटण या ठिकाणी जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची डोके दुखी वाढत आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण फलटण तालुक्यात आढळून येत आहेत.
फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता सर्वाधिक रुग्ण फलटण शहरासह गुणवरे, निंबळक, बरड, पिंप्रद या भागात आढळून येत आहेत. प्रशासनाकडून शनिवारी व रविवारी संचार बंदी व कडक लॉकडाऊन चे आदेश असतानाही पिंप्रद या गावातील राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल या ठिकाणी शनिवारी दिनांक ७ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर लोक गोळा करून हा सोहळा पार पडला. या मध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंग पाळलेले दिसत नव्हते कोणाच्याही तोंडाला साधा मास्क देखील नव्हता. या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे प्रशासनाचे नागरिकांनी वाभोडे काढले आहेत.
फलटण येथील जैन सोशल ग्रुप ने शनिवारी विकेंड लॉकडाऊन दिवशी चक्क पत्रिका छापून हा पदग्रहन सोहळा पार पाडला भाषणे, सत्कार समारंभ, चर्चासत्र आणि जेवण असा थाटामाटात हा कार्यक्रम पार पडला. नको तिथं पुढे पुढे करणारे अधिकारी मात्र यावेळी सर्व माहीत असतानाही गप्प बसले होते विशेष म्हणजे या कार्यक्रम स्थळाच्या जवळच बरड पोलिस ठाण्यातील पोलिसांना याची कुणकुण लागली नसेल हे नवलच. या कार्यक्रमाचे आयोजक व उपस्थित मान्यवर तसेच या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हजेरी लावणाऱ्या सर्व व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी होत असून या कार्यालयाच्या मालकांच्या विरोधात दंड आकारून गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
फलटण मधील व्यापारी वर्गाचा या मध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असताना या ग्रुपला ही सूट कोणी दिली याची चर्चा आता फलटण मध्ये रंगलेली आहे. एखाद्या गरिबांचे लग्न किंवा कार्यक्रम असला की त्यावर करडी नजर ठेवुन हजारो रुपयांचा दंड आकारून गुन्हा दाखल करण्यास सक्षम असणारे प्रशासन या बाबतीत आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलिस प्रमुख अजय बन्सल यांनी या प्रकरणी लक्ष घालून कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.