बारामती : कारगील विजय दिवसाचे औचित्य साधत बारामती शहरामधील सुप्रसिध्द नेत्रविशारद डॅा. हर्षल राठी यांच्या पुढाकाराने आजी-माजी सैनिक परिवारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये बारामतीच्या आसपास राहणाऱ्या शंभरहून अधिक सैनिक परिवारांनी आपला सहभाग नोंदवला. हे शिबिर रविवार दि. २५ जुलै रोजी भिगवण रस्ता येथील प्रिझ्मा आय केअर आणि स्पंदन आयुर्वेद व पंचकर्म केन्द्राच्या कार्यालयामध्ये भरवण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातुन सर्व सैनिक परिवारांना मोफत नेत्र तपासणी व्यतिरीक्त मोफत औषधोपचार, “ना नफा, ना तोटा” तत्वावर अतिशय अत्यल्प दरामध्ये मोतीबिंदू शस्ञक्रिया तसेच चष्म्याची सोय करण्यात आली होती. शिवाय स्पंदन आयुर्वेद व पंचकर्म केन्द्राच्यावतीने पन्नासहून अधिक सैनिक परिवारांवर “ना नफा, ना तोटा” तत्वावर आयुर्वेदीक उपचार करण्यात आले. तसेच नाव नोंदवलेल्या सर्व इच्छुकांना पंचकर्माचे उपचार करण्यात येणार आहेत. प्रिझ्मा आय केअर आणि स्पंदन आयुर्वेद व पंचकर्म केन्द्राव्यतिरीक्त जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेचे या शिबिराच्या आयोजनामध्ये विशेष सहकार्य लाभले. शिबिराचे उद्घाटन त्रिदल आजी-माजी सैनिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. संदिपभाऊ लगड, बारामती तालुका क्रीडाधिकारी श्री. लकडे, संघटनेचे अध्यक्ष श्री. हनमंत निंबाळकर, सोमेश्वर विभागाचे कार्याध्यक्ष श्री. अनिल शिंदे, सचिव श्री. राहुल भोईटे तसेच डॉ. हर्षल राठी व डॉ. अपर्णा राठी यांच्या हस्ते करण्यात आलेे. सदर शिबीराच्या माध्यमातून तिसहुन अधिक रुग्णांवर मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया आयोजित करण्यात आलेल्या आहेत. देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्राणाचे बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी प्रथमच एका हॉस्पीटलने पुढाकार घेतल्यामुळे सैनिक कुटुंबांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम यापुढील काळांत आयोजीत करण्याचा आपला मानस याप्रसंगी डॉ. राठी दांपत्याने बोलून दाखवला.