सातारा दि.27 ( जिमाका) राज्यामधील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध योजना आखलेल्या आहेत. त्या मध्ये फलटणला मध्यवर्ती केंद्र मानून फलटणसह आजूबाजूच्या पर्यटन स्थळांचा विकास साधायचे निश्चित केलेले आहे. फलटणसह आजूबाजूच्या गावांमधील ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असलेली स्थळे हि आगामी काळामध्ये पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत , अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण येथील “मुधोजी मनमोहन राजवाडा” येथे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी फलटण नगरपरिषदेच्या जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे भोसले, सद्गुरू उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले, जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, महंत विद्वांस शामसुंदर शास्त्री, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोषी, NDTV च्या विशेष प्रतिनिधी हर्षा कुमारी सिंग, नगरसेवक अजय माळवे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना ना. श्रीमंत रामराजे म्हणाले कि, फलटण मधील ऐतिहासिक असलेल्या श्री मुधोजी मनमोहन राजवाडा, नागेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, जबरेश्वर मंदिर, महानभव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या चक्रधर स्वामी मंदिर, आबासाहेब मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, जैन धर्मियांचे श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, धनगर समाजाचे दैवत समजले जाणारे श्री बिरदेव मंदिर, श्री भिवाई माता मंदिर, श्री धुळदेव मंदिर यांचा समावेश सदरील डॉक्युमेंट्री करण्यात येणार आहे. या शिवाय महाराष्ट्राचे लोकनृत्य समजले जाणारे धनगर समाजाचे गजी नृत्य सुद्धा सदरील डॉक्युमेंट्री मध्ये दाखवले जाणार आहे.
फलटणमधील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले फलटण तालुक्यामधील करण्यात येणाऱ्या शेती प्रकार सुद्धा सदरील डॉक्युमेंट्री मध्ये दाखवण्यात येणार आहेत. फलटण तालुक्यामधील विविध फळबागांची माहिती यात समाविष्ट करण्यात येणार आहे. या मध्ये प्रामुख्याने डाळिंब, द्राक्षी व प्रगतशील ऊसाच्या शेतीची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे, असेही या वेळी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
वेळापूर ता. माळशिरस येथील अर्धनारीनटेश्वर, सातारा तालुक्यातील लिंब येथील बारामोटेची विहीर, औंध ता. खटाव येथील मूळपीठ श्री यमाई मंदिर, वास्तू संग्रहालय, शिखर शिंगणापूर ता. माण येथील श्री शंभू महादेवाचे मंदिर, गोंदवले ता. माण येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर यांचा समावेश सुद्धा सदरील डॉक्युमेंट्री मध्ये करण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये फलटणसह परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने परिपूर्ण विकास साधण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पेतून पर्यटनाच्या दृष्टीने परिपूर्ण विकास साधण्याचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.