सातारा, दि.23 (जिमाका): पाटण तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या ठिकाणी मदत कार्य तातडीने सुरु करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या आंबेघर, मिरगाव-कामगारगाव या ठिकाणी एन.डी.आर.एफ. च्या पथकासमवेत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पहाणी केली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या पहाणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या स्थलांतरीत 5 हजार कुटुंबांना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य तसेच अन्नधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच घर पडझडीमुळे बाधीत झालेल्या 500 कुटुंबांना सध्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केलेल्या ठिकाणी ब्लँकेट, चादरी, सतरंजी इत्यादींची व्यवस्थाही करण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.