वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य या समूहाकडून पुस्तक वाचन व समीक्षण शतकपूर्ती केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
फलटणचे सरचिटणीस ,आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरचे अध्यक्ष, सातारा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक *श्री.गणेश तांबे यांना वाचनयात्री हा राज्यस्तरीय पुरस्कार* जाहीर करण्यात आलेला आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व 1001 रुपयांची पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 6000 सदस्य संख्या असणाऱ्या या समूहातील पहिले वाचन यात्री पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत असे मत वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य संयोजिका
प्रतिभाताई लोखंडे यांनी व्यक्त केले. गणेश तांबे यांच्या यशाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
वाचनसाखळी समूहाकडून पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळाली- गणेश तांबे
पाझर मातृत्वाचा…! हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपादित केलेले माझे पहिले पुस्तक माझ्या लाडक्या आईच्या व विश्वातील तमाम आईंच्या चरणी समर्पित.
पाझर मातृत्वाचा…! या पुस्तकाचे प्रकाशन आमचे लाडके दैवत आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या हस्ते मुधोजी महाविद्यालय फलटण आयोजित पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते त्या प्रसंगी संपन्न झाला.
पाझर मातृत्वाचा..! या पुस्तकाचे समीक्षण अनेक लेखक-कवी यांनी केलेले आहे.मी फक्त या पुस्तकाच्या निर्मिती मागची पार्श्वभूमी आपणास या 100 व्या पुस्तकानिमित्त आपणासमोर मांडणार आहे.
पुस्तक वाचन व समीक्षण यांची शतकपूर्ती होत असताना मी स्वतः संपादित केलेले पुस्तक निवडलेलं आहे,त्यामुळे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय व दुग्धशर्करा योग आहे.
पाझर मातृत्वाचा…! या पुस्तकाची निर्मिती करताना शेकडो ज्ञात-अज्ञात मित्रांचे हात याच्या पाठीमागे आहेत. त्याचप्रमाणे पुस्तक समिक्षण शतकपूर्ती करत असताना मला अत्यंत आनंद होत आहे की, वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य हा फेसबुक ग्रुप पहिल्या लॉकडाऊनच्या
काळामध्ये,आदर्श व उपक्रमशील शिक्षिका,एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय श्रीमती.प्रतिभाताई लोखंडे मॅडम यांनी या समूहाची निर्मिती केली.आणि वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळाली.आज या समूहाची सदस्य संख्या 6000 च्या पुढे गेलेली आहे. यामध्ये दर महिन्याला नवनवीन स्पर्धा, पुस्तक परीक्षण,पुस्तकरूपी बक्षिसे यामुळे सर्व वयोगटातील वाचक ,स्पर्धक या वाचनसाखळी समूहामध्ये सामील झाले आहेत. प्रतिभाताई लोखंडे यांच्या जोडीला तितक्याच ताकतीने कार्य करणाऱ्या,आदर्श शिक्षिका श्रीमती.प्रतिभा टेमकर मॅडम यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. दोघींच्या नावांमध्ये प्रतिभा. या प्रतिभारुपी जोडीने प्रतिभावंत पिढी घडवण्यासाठी अतुलनीय कार्य सुरू केले आहे. तसेच या समूहातील अनेक सदस्य यांचेही सहकार्य या कार्याला लाभलेले आहे. वाचन करत असताना कुटुंबातील सदस्य,आप्तेष्ट,अनेक शिक्षक मित्रपरिवार यांनी वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले, काहींनी पुस्तके उपलब्ध करून दिली.या सर्वांचेच खरंतर मनापासून आभार.
आई 29 जून 2017 रोजी आम्हाला सोडून गेली………आज तिचे चौथे पुण्यस्मरण……आजही आईच्या आठवणीत तितकाच आहे. आईची आठवणरुपी ज्योत मनात कायम तेवत ठेवण्यासाठी सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने “आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर” ची 2017 साली विजय दशमीच्या मुहूर्तावर स्थापना केली, आणि या संस्थेमार्फत अत्यंत कमी कालावधीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले. यामध्ये रक्तदान शिबिर, वृद्धाश्रम भेट, रुग्णालय भेट,वृक्ष लागवड, काव्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, शिक्षक पुरस्कार, ग्रंथालयास पुस्तक भेट,विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला प्रश्नमंजुषा स्पर्धा असे अनेक उपक्रम हाती घेतले व ते यशस्वीही झाले ते केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच! त्यातीलच एक उपक्रम म्हणजे निबंध स्पर्धा आणि विषय होता आई………
“आई” विषयावर निबंध स्पर्धेत सुमारे 275 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले होते. व प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. त्यातील पहिले तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे निबंध या पुस्तकांमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षणाधिकारी,
गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक मित्र परिवार,कॉलेजचे विद्यार्थी यांचेही लेख यामध्ये समाविष्ट केले आहेत.
संपूर्ण “आईमय” असणारे,
“पाझर मातृत्वाचा…!” हे पुस्तक सर्वांच्या हृदयात पाझर निर्माण करणारे आहे,मनाला व चित्ताला गारवा देणारे आहे, तसेच पुस्तकातील लेख वाचन करत असताना डोळ्यातील अश्रूंचा अभिषेक नकळत गालावर झालेला दिसून येतो.आईरुपी दैवताचा अनमोल असा ठेवा या पुस्तकामध्ये आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचेही लेख यामध्ये आहेत.आपण लिहिलेली एखादी रचना ज्यावेळेस पुस्तकांमध्ये त्याचे रूपांतर होते, त्यावेळेस त्या लेखकाला लेखनाची प्रेरणा मिळते. त्यामुळे सहाजिकच बालचमूनाही आपले लेखन पुस्तकरुपी तयार झाल्यामुळे ते पुस्तक हातात घेवून वाचन करण्याची एक वेगळीच अनुभूती त्यांना मिळालेली दिसून आली.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या आई विषयी असणारी भावना,प्रेम, जिव्हाळा, संघर्षमय जीवन अत्यंत सुंदर व मोजक्या समर्पक शब्दात या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर दुसरी स्पर्धा कधी घेणार आहेत? याविषयी विद्यार्थ्यांचे सतत फोन येऊ लागले. त्यांच्यामध्ये स्पर्धेची, लेखन करण्याची, वाचन करण्याची एक ओढ निर्माण झाली.आणि दुसरीही स्पर्धा उदंड प्रतिसाद देत संपन्न झाली.एका गोष्टीचा या ठिकाणी मनापासून आनंद वाटतोय की, विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची, लेखन करण्याची गोडी निर्माण झालेली दिसून आली.
“पुस्तकाची संगतच खरी आयुष्याची रंगत वाढवताना दिसून येते” पुस्तक वाचनाने मस्तक सुधारतं,सुधारलेलं मस्तक कोणाचे हस्तक तर होतच नाही, पण लाचारीने कोणापुढे ते नतमस्तकही होत नाही. कारण चांगले विचार, चांगले संस्कार हे पुस्तकातूनच मिळत असतात. प्रत्येक घराघरात ज्याप्रमाणे देवालय असते, त्याच प्रमाणे प्रत्येक घराघरात एक ग्रंथालयही असावे,आणि ग्रंथ हेच देव व्हावेत. नव्या पिढीच्या नावे बँकेत पैशांच्या ठेवी ठेवण्यापेक्षा त्यांना संस्काराच्या ठेवी देणाऱ्या पुस्तकांच्या बँका उभारल्या पाहिजेत.आणि ही खरी काळाची खूप मोठी गरज आहे,आणि ही गरज,वाचनसंस्कृती वाढवण्याची, जोपासण्याची, रुजवण्याची किमिया वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य करताना दिसून येते.याचे कारण… स्वतः मीच या समूहातील एक ज्वलंत उदाहरण आहे,कारण वाचनसाखळी समूहामुळे माझ्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली.
जन्मदात्या आईचे दातृत्व आणि मातृत्व अपरंपार असते. आईच्या महती पुढे सर्व शब्द अपुरेच…!
झिजवली काया
लावूणी माया lसकळा रे ll
उपकारांचे अधिष्ठान
आई प्रतिष्ठान व्रत्तसेवा परोपकारे
पाझर मातृत्वाचा…! या पुस्तकात अनंत उपकाराची सावली माझी माऊली,आई एक नंदादीप, दिपस्तंभ -माझी आई, माय लेक-नातं तुझं माझं,आई- एक तेवत राहणारी ज्योत, आई समजून घेताना, आई विधात्याचे वरदान, आठवणीतील आई, मायेचा अथांग सागर,असे एकूण ४३ लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत.
पाझर मातृत्वाचा…! या पुस्तकाला शुभेच्छारुपी संदेश महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा.श्रीमंत.रामराजे नाईक निंबाळकर(महाराज साहेब),मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर(बाबा)
मा.अध्यक्ष जि.प.सातारा,
मा.श्री.संजय भागवत साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा,मा.श्री.मनोज जाधव साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जि.प.सातारा, मा.प्रभावती कोळेकर मॅडम शिक्षणाधिकारी (प्राथ.)
जि.प.सातारा,व प्रसिद्ध निवेदक व व्याख्याते मा.श्री. नवनाथ कोलवडकर सर यांचे संदेश या पुस्तकात समाविष्ट आहेत.
आता थांबणे नाही……….आज जरी पुस्तक वाचनाची शतकपूर्ती पूर्ण झाली असली तरीही या ज्ञानाचा उपयोग इतरांना जास्तीत जास्त होण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेन. वाढदिवसाला बुके देण्याऐवजी बुक देऊन सर्वांनी वाचन संस्कृती वाढवली पाहिजे एवढीच इच्छा व्यक्त करतो.
आणि पुन्हा एकदा
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य समूहाच्या संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे व प्रतिभाताई टेमकर,तसेच सर्व सदस्यांचे, मित्रपरिवार यांच्या ऋणात राहून आभार व्यक्त करतो.
धन्यवाद!!
पृष्ठसंख्या-126
मूल्य-125
अभिप्राय शब्दांकन-
सिंधुसूत….🖋️
श्री.गणेश सिंधूबाई भगवान तांबे