बारामती : शैक्षणिक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या आर एन आगरवाल टेक्निकल विद्यालयातील मराठी विषयाच्या शिक्षिका सौ.उर्मिला भोसले यांना वोडाफोन आयडिया फाउंडेशनतर्फे एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
वोडाफोन आयडिया फाउंडेशनकडून दरवर्षी शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येतात. संस्थेने शिफारस केल्यानुसार मार्च महिन्यात शिक्षकांनी अर्ज केले होते. देशभरातून सात ते आठ लाख शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यातून ८००शिक्षकांची ऑनलाइन माध्यमातून मुलाखत घेण्यात आली. २२ राज्यांतून निवड करण्यात आलेल्या ११० शिक्षकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. त्यामध्ये ऊर्मिला भोसले यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
उर्मिला भोसले यांचा ‘रयतेचे शिक्षण भगीरथ’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे.विद्यालयात सोलर लॅम्प कार्यशाळा,नाणी व नोटा प्रदर्शन असे विविध उपक्रम यांनी राबवले आहेत.विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा अश्या स्पर्धांमधून अनेक विद्यार्थानी जिल्हा व राज्य पातळीवर यश मिळवले आहे.विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षा तसेच आर टी एस परीक्षा ला त्या मराठी व्याकरणाचे उत्कृष्ट मार्गदर्शन करतात.सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन सारखे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.शिक्षकांसाठी ‘डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम पूर्ण केला सध्या त्या पीएचडी करीत आहेत. ई-कन्टेन्ट निर्मिती आणि यू-ट्यूब वाहिनीवरील अनेक व्हिडिओ त्यांनी तयार केले आहेत.या अगोदर ही त्यांची आदर्श शिक्षिका म्हणून निवड झालेली आहे. करोना काळात तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या केलेल्या प्रयत्नाची दखल घेतली गेली.त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्रा.राजेंद्र काकडे,उपमुख्याध्यापक श्री अर्जुन मोहिते,पर्यवेक्षक श्री विष्णू बाबर,रयत शिक्षण संस्थेचे समन्वय समितीचे सदस्य व आजीव सभासद श्री बंडू पवार,आजीव सभासद श्री अर्जुन मलगुंडे , इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.