भारतीय सैन्य दलातील आर्मीमध्ये पुणे आर्मी रिक्रुटींग ऑफीस अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इ. 8 वी, 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी नसून पुणे आर्मी रिक्रुमेंट ऑफीस अंतर्गत येणाऱ्या अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या 6 जिल्ह्यांसाठी असणार आहे. ही भरती प्रक्रिया 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी असणार आहे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक असून ते 9 जुलै ते 22 ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. ॲडमीट कार्ड 24 ऑगस्ट नंतर उपलब्ध होणार आहे. या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर जनरल ड्युटी, ट्रेड्समॅन या पदांसाठी अर्ज करता येईल. तर 8 वी उत्तीर्ण उमेदवारांना ट्रेड्समॅन मधील मेस किपर, हाऊस किपर यासारख्या पदांकरीता अर्ज करता येईल. याशिवाय 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर टेक्निकल, सोल्जर नर्सिंग असिस्टंट आदि पदांसाठी अर्ज करता येईल. या भरतीसाठी सुरूवातीला शारीरिक मोजमापे घेतली जातील व त्यानंतर 100 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये 1600 मीटर धावणे व पुलप्स हे दोन प्रकार असणार आहेत. याशिवाय 9 फुट रूंद खड्डा पार करणे व निमुळत्या झिगझॅक फळीवरून तोल संभाळत चालणे या प्रकारांचा समावेश असणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. या वैद्यकीय चाचणीत दृष्टीदोष, शारीरिक व्यंग इत्यादी तपासण्या केल्या जातील. शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून लेखी परीक्षा घेतली जाईल. शेवटी मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांकडे ॲडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे, डोमेसाईल प्रमाणपत्र, जात व धर्म प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र आदि कागदपत्र असणे आवश्यक आहे. याबाबत बोलताना सह्याद्री करिअर अकॅडमी, बारामती चे संचालक उमेश रूपनवर म्हणाले की, ‘भारतीय सैन्य दलांमध्ये पुणे आर्मी रिक्रुटींग ऑफीस अंतर्गत होणाऱ्या आर्मी भरतीमध्ये पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याचा समावेश केला आहे. या भरतीतील पात्रता, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, बोनस गुण व इतर बाराकावे जाणून घेतल्यास यामध्ये मुलांना सहज भरती होता येईल.’