महापुरुषाच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण नगरपरिषदेच्या माध्यमातून अत्यंत नियोजनबद्ध होईल : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण, दि. १९ : लोकमान्य टिळकांचा संस्कृत व इंग्रजी वाङ्‌मयाचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचेही अध्ययन केले होते. त्यांच्या व्यापक व्यासंगाचे उत्कृष्ट प्रतिबिंब गीतारहस्यात पहावयास मिळते. राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक काम करीत असताना कधी तुरुंगात व अन्य वेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली, त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले. बहुतेक त्यांचे लेखन संशोधनपर असून प्रत्येक ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केली आहेत. अश्या या महापुरुषाने केलेल्या कार्याचा अभ्यास करून युवा पिढीने कार्यरत राहिले पाहिजे. अश्या ह्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण नगरपरिषदेच्या माध्यमातून अत्यंत नियोजनबद्ध होईल, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

शंकर मार्केट फलटण येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या आवाराच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग गुंजवटे, महाराष्ट्र साहित्य व कला मंडळांचे सदस्य व जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ. प्रगती कापसे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, तुषार नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान होय. भारताच्या सर्वांगीण व सर्वंकष राजकीय-सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्यांना द्यावेच लागते. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात टिळकयुग हा फार महत्त्वाचा टप्पा मानण्यात येतो. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण उत्कृष्ठ दर्जाचेच होईल यामध्ये कसलीही शंका नाही, असे मत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केले.
लोकमान्य टिळकांची भूमिका राजकारणी पुरुषाची होती आणि स्वराज्य हा त्यांचा प्रधान हेतू होता. याकरिता ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभारातील दोष व अन्याय यांवर वृत्तपत्रांतून उघड टीका करून त्यांनी कायद्याची मर्यादा प्रथम सांभाळली. जनतेच्या मनात ज्वलंत देशाभिमान व स्वातंत्र्यप्रेम चेतवून, स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष करण्यास लोकांची मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न केला, स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना अर्जविनंत्यांचे राजकारण करणाऱ्‍या नेमस्त पक्षाविरुद्ध सतत संघर्ष करावा लागला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, या भूमिकेपर्यंत लोकांना नेण्याचे कार्य, हा लोकमान्यांचा संकल्प होता. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हे जलद गतीने करण्यात येईल. या पुतळा परिसर सुशोभित करण्यासाठी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ. प्रगती कापसे यांनी विशेष पाठपुरावा केलेला आहे, असे मत माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग गुंजवटे यांनी या वेळी व्यक्त केले.

या वेळी विजय ताथवडकर, अनिरुद्ध रानडे, श्रीराम सहस्रबुद्धे, चंद्रशेखर दाणी, मुकुंद जोशी, सचिन कुलकर्णी, वैभव विष्णूप्रद, मिलिंद लाटकर, किशोर देशपांडे, जयंत सहस्रबुद्धे, सचिन तिवाटणे, पराग देशपांडे, नितीन तारळकर, दर्शन डेंगे, शंतनु रूद्रभटे, अथर्व ढवळीकर, मोबीन इनामदार, दिलीप चवडंके यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!