सातारा दि.18 (जिमाका): मागासवर्गीय पात्र प्रवेशित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून सर्व कॉलेज/महाविद्यालयांनी कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी वसूल करण्यात येवू नये, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजनांचा लाभ दिला जातो. सदर योजनेचा लाभ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन देण्यात येतो.
माहे जून 2021 पासून 2021-22 हे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. त्यानुसार शिष्यवृत्ती योजनेच्या शासन निर्णयानुसार सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजनांकरिता अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये व तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरुध्द फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यंनी दिले आहेत.