बारामती :फलटण टुडे वृतसेवा जळोची – लाकडी रोडवर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कन्हेरी वन क्षेत्रात जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंकारा हरीण जखमी झाले होते. किशोर रायते हे बारामतीच्या दिशेने येत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला हे जखमी अवस्थेत चिंकारा हरीण दिसले, त्यांनी सदरील घटनेची माहिती ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन बारामती या संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधव यांना कळवली, घटणेचे गांभीर्य लक्षात घेऊन जाधव व त्यांचे सहकारी तात्काळ या घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वनविभागाची गाडी येण्याची वाट न पाहता त्वरीत स्वःताच्या मोटारसायकल वरून या जखमी चिंकारा ला सुरक्षितरित्या बारामती वनविभागाच्या आँफिस मध्ये घेऊन गेले.
बारामती वनविभागात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता पुणे येथील अनाथालयात पाठवण्यात आले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना सर्पमित्र अमोल जाधव यांनी सांगितले सदरील जखमी चिंकारा हा मादी जातीचा असून त्याचे सोबत एखादे पिल्लू असण्याची शक्यता आहे, तसेच चिंकारा, काळवीट सारख्या प्राण्यांना रस्त्यात दिसल्यानंतर गाडीने उडवणे हा कायद्याने गुन्हा असल्याने कोणीही या वन्य प्राण्यांना इजा पोहोचवू नये अथवा शिकार करण्याचा प्रयत्न करू नये.
यावेळी संपर्क साधलेले किशोर रायते, सर्पमित्र अमोल जाधव आणि वनरक्षक मीनाक्षी गुरव उपस्थित होते.