मला काही होणार नाही या भ्रमात राहुन स्वतः आणि कुटुंबाबरोबर गावाला कोरोनाच्या खाईत लोटू नका : मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब)

     

फलटण दि.३० : लक्षणे दिसताच चाचणी करुन घ्या, पॉझिटीव्ह आलात लगेच विलगीकरण कक्षात दाखल व्हा, अधिक त्रास असेल तर रुग्णालयात जा मात्र कोणत्याही परिस्थितीत मला काही होणार नाही या भ्रमात राहुन स्वतः आणि कुटुंबाबरोबर गावाला कोरोनाच्या खाईत लोटू नका असा इशारा महाराष्ट्र विधान परिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी दिला आहे.
      कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या माध्यमातून ढवळपाटी, वाखरी ता.फलटण (जलनायक श्रीमंत रामराजे नगर) येथील उप बाजार आवारातील कृषी लक्ष्मी मंगल कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षाचे उदघाटन समारंभात मार्गदर्शन करताना मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) बोलत होते, अध्यक्षस्थानी मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब होते, बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), उपसभापती भगवानराव होळकर, बाजार समिती संचालक, पंचायत समिती सदस्य मा.श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा), गोविंदचे संचालक मा.श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा), प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
      कोरोना मधून सहिसलामत बाहेर पडायचे असेल, आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी असेल तर शासन, प्रशासन, ग्रामदक्षता समिती यांच्या सूचनांचे पालन करावे लागेल, आता घरात नव्हे, गावातील अथवा लगतच्या विलगीकरण कक्षात दाखल व्हा, तेथे सर्व सुविधा सह वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, गरज असेल तर तेथूनच रुग्णालयात दाखल केले जाईल, आवश्यक त्या सर्व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था, गरजेनुसार औषधे इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्यात शासन प्रशासन आणि आम्ही कोठेही कमी पडणार नाही, मात्र तुम्ही पॉझिटीव्ह असूनही घरातच राहिलात तर कठीण प्रसंग उदभवेल, त्यातून संपूर्ण कुटुंब, गाव, तालुका मोठ्या संकटात सापडण्याचा धोका लक्षात घेऊन वेळीच चाचणी करुन घ्या, पॉझिटीव्ह आलात तर लगेच उपचार घ्या, असे आवाहन ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी केले आहे.
      फलटण तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात एक याप्रमाणे कोरोना उपचार व विलगीकरण कक्ष सुरु केले आहेत, फलटण येथे उप जिल्हा रुग्णालय व कोरोना उपचार केंद्र सुरु केली आहेत, गरज वाटल्यास सातारा, कराड, पुणे येथे पाठवून उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत चाचणी (टेस्ट) करुन घ्या, बाधीत असाल तर लगेच उपचार असे पुन्हा-पुन्हा आवाहन करीत नव्याने आलेला म्युकर मायकोसिस आणखी घातक आहे, त्याच्या उपचाराची व्यवस्था करण्यात येत असल्याचे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी सांगितले.
      निंबळक सारख्या छोट्या गावात मोठ्या संख्येने लोक बाधीत आढळून आले ते  केवळ लोकांनी सूचना पाळल्या नाहीत, ग्रामदक्षता समिती, आशा वर्कर, प्रशासनाच्या सुचनाकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट करीत अशी परिस्थिती उदभवणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घ्या, उपचाराच्या सुविधा व व्यवस्थेसाठी आम्ही व शासन, प्रशासन खंबीर असल्याची ग्वाही मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी दिली.
      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने विविध सेवा, सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, आपण स्वतः संपूर्ण तालुक्याचा दौरा करुन लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या, त्यापलीकडे जाऊन या तालुक्यात शेतकरी व सर्वसामान्य माणूस वैद्यकीय सेवा सुविधांपासून वंचित राहु नये म्हणून महाराजा मालोजीराव मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी बाजार समितीच्या आवारात करण्यात येत असून लवकरच दर्जेदार वैद्यकीय सेवेचे दालन फलटणकरांच्या सेवेत दाखल होत असल्याचे बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी निदर्शनास आणून दिले.
      बाजार समितीचे २ संचालक व तालुक्यातील अनेकांचे अकस्मात झालेले निधन आम्हाला कोरोनाची धास्ती वाढविणारे ठरल्याने बाजार समितीने हे विलगीकरण केंद्र सुरु केले असून येथे व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन व जनरल बेडची व्यवस्था तसेच डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय कर्मचारी, औषधे उपलब्ध करुन देऊन एक उत्तम कक्ष उभारला आहे, परिसरातील ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केले.
      ढवळपाटी येथील या विलगीकरण कक्षाच्या व्यवस्थापन किंबहुना संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा), गोविंदचे संचालक श्रीमंत सत्त्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी जाहीर केले.
      कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी महाराष्ट्र केसरी पै.बापूराव लोखंडे, माजी सभापती मोहनराव लोखंडे व रामभाऊ ढेकळे, मा.नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, ढवळ सरपंच अंकुश लोखंडे, आप्पा लोखंडे, शंकर लोखंडे, तरडफ माजी सरपंच रवी पिसाळ, पिराचीवाडी सरपंच दिपक सावंत, रणजीत तांबे, अधिकराव ढेकळे, अशोकराव निंबाळकर, नंदू नाळे (भाऊ), दालवडी सरपंच मधुकर शिंदे, संतोष जाधव सर, दत्तात्रय मोहिते सर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रांत पोटे, डॉ.अनिल गारडे, डॉ.रणजीत बर्गे, आशा वर्कर्स, बिबी आरोग्य केंद्राचे डॉ.खताळ व त्यांचा सहकारी स्टाफ, फलटण तालुका व्यापारी असो.चे शशिकांत दोशी, साई कृपा वे ब्रिजचे राम निंबाळकर, मार्केट कमिटी सर्व स्टाफ यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, स.रा.मोहिते, अजय माळवे, सुभाष भांबुरे, चैतन्य रुद्रभटे, विजय भिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
      विशेष म्हणजे सदर कोविड केअर सेंटर साठी कै.श्रीमती माणिकबाई मोतीलाल दोशी यांचे स्मृती प्रित्यर्थ अन्नदानासाठी मे.शशिकांत दोशी यांनी रक्कम रु.१०,०००/- आणि यश उदयोग समूह च्या वतीने हर्षल लोंढे यांनी १० वाफ मशीन, ३ ऑक्सिमिटर, २ टेम्परेचर स्कॅनर आणि वाखरी चे मा.सरपंच रणजित तांबे यांनी रु.११,०००/- ची आर्थिक मदत मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांचे शुभहस्ते समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे कडे सुपूर्द केली.
      प्रारंभी उपसभापती भगवानराव होळकर यांनी सर्वांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर फित कापून विलगीकरण कक्षाचे लोकार्पण करण्यात आले, सचिव शंकरराव सोनवलकर यांनी समारोप व आभार मानले. प्रा.नवनाथ लोखंडे यांनी सूत्र संचालन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!