वाठार निंबाळकर : शिक्षण क्षेत्रातील एक असामान्य प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे
श्री.गजानन शिंदे साहेब हे सोमवार दिनांक ३१.५.२०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल त्यांच्या कार्याचा घेतलेला हा छोटासा आढावा
“गजानन” या त्यांच्या नावा प्रमाणेच कोणत्याही कार्यात सर्व प्रथमत पुढाकार घेऊन शिक्षण क्षेत्रात इतिहास घडवणारे एक व्यक्तिमत्व .कारण इतिहास हा कोणाचाही लिहिला जात नाही. त्यासाठी अपार कष्ट, मेहनत,जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास हा आपल्या नसानसात ठासून भरलेले आणि निस्वार्थीपणे शिक्षण क्षेत्रासाठी कार्य करण्यास झोकून देणारे एक असामान्य व्यक्तिमत्व ज्यांनी आपली प्रदीर्घ 37 वर्षांची प्रदीर्घ सेवा आज पूर्ण केली ते म्हणजे
श्री.गजानन मुगुटराव शिंदे साहेब केंद्रप्रमुख बिबी /आदर्की
शिंदे साहेब हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे.आणि असामान्य माणसंच डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहतात, आणि डोळे मिटेपर्यंत स्वप्नाचा पाठलाग करतात,त्यांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपड असतात. काही स्वप्ने ही वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात हे शिंदे साहेब यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते,आणि अशी महत्वकांक्षा ठेवणारी माणसंच जगात असामान्य ठरतात
सातारा जिल्ह्यातील फलटण या ऐतिहासिक शहरापासून काही अंतरावर असणारे दालवडी या गावी 1963 साली जन्म झाला. तसं पाहिलं तर ते पूर्वी पासून दुष्काळी गाव.परंतु अलीकडच्या काळात श्रीमंत.रामराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर आणि संपूर्ण राजे परिवार यांच्या अथक प्रयत्नातून संपूर्ण तालुक्यात व या परिसरात डोंगर,दऱ्यातून पाणी आल्याने हरितक्रांती घडलेली दिसून येते
परंतु पूर्वीच्या काळी हा कायम दुष्काळी भाग असल्यामुळे शेती पिकत नसे. साहेबांची घरची परिस्थितीही जेमतेम होती.गंभीर परिस्थितीत खंबीरपणे उभे राहणारे शिंदे साहेब त्यांच्या अंगी शिकण्याची असणारी अपार जिद्द, मेहनत करण्याची तयारी हे सर्व गुण शिंदे साहेब यांच्या अंगी असल्यामुळे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावांमध्ये पूर्ण केले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळोवेळी इतर कामे ही करावी लागायची तरीसुद्धा ते डगमगले नाहीत. शिंदे साहेबांच्या आयुष्याच्या वाट्यालाही अनेक चित्र विचित्र प्रसंग आले.परंतु त्या विचित्र प्रसंगात ही त्यांनी छान रंग भरले, विचित्र परिस्थितीला सामोरे जाऊन या परिस्थितीत परिवर्तन करण्याचे सामर्थ्य. मन, मनगट, मेंदूत त्यांच्या ठासून भरलेले दिसून येते. आणि अशीच माणसं स्वतःला ओळखतात आणि यश त्यांनाच ओळख देते. साहेबांनीही कठीण परिस्थितीत आपले शिक्षण चालूच ठेवले.
असाध्य ते साध्य
करिता सायास
कारण अभ्यास
ही संत तुकोबांची शिकवण शिंदे साहेबांना हुबेहूब लागू पडते.एखादी गोष्ट त्यांनी मनावर घेतली की, माणुस यशाचे शिखर गाठू शकतो हे शिंदे साहेब यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजते. घरामध्ये आईचा आधार गेल्यानंतर न डगमगणारे शिंदे साहेब, भावाच्या अकाली निधनानंतर मनामध्ये अतीव दुःख लपवून चेहऱ्यावर हास्य ठेवून विद्यार्थ्यांना घडवणारे शिंदे साहेब एक दीपस्तंभच.
आदरणीय शिंदे साहेब यांच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेची सुरुवात गिरवी या गावामध्ये 1985 साली नोकरीला सुरुवात झाली
यानंतर गोपूज ता.खटाव, उपळवे,तरडफ,ढवळ,
दालवडी या गावांमध्ये झाली. शिष्यवृत्ती पॅटर्न याच बरोबर विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर कित्येक वर्ष विद्यार्थी यशस्वी, शैक्षणिक उठाव, परसबाग, तज्ञ मार्गदर्शक इत्यादी विविध उपक्रम त्यांनी राबवले.
शिंदे साहेबांच्या यशस्वी शैक्षणिक कार्यामुळे त्यांना फलटण तालुक्यातच केंद्रप्रमुख म्हणून 2013 साली बिबी केंद्र मिळाले आणि त्याच्या सोबतीला आदर्की केंद्र.दोन्ही केंद्राचा चार्ज असतानाही शैक्षणिक कार्यात तालुक्यांमध्ये दोन्ही केंद्र नेहमी अग्रेसर राहताना दिसून आली सर्वात जास्त आय.एस.ओ मानांकन प्राप्त शाळा, शैक्षणिक गुणवत्ता विविध स्पर्धेमध्ये यशस्वी वाटचाल, डिजिटल शाळा क्लासरूम,बाल आनंद मेळावा हा तर तालुक्यात चर्चेचा विषय इतका सुंदर नियोजनबद्ध कार्यक्रम, स्वच्छ सुंदर शाळा यामध्ये दोन्ही केंद्रातील शाळा तालुक्यात प्रथम, विद्यार्थी क्रीडा स्पर्धा, शिक्षक क्रीडा स्पर्धा, जिल्हा स्तरावर यशस्वी वाटचाल. विज्ञान प्रदर्शनामध्ये दोन्ही केंद्रातील शिक्षकांची राज्यस्तरावर निवड, तसेच त्यांच्या कालावधीमध्ये तालुका व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रमाण या दोन्ही केंद्रामध्ये जास्त होते. पंचायत राज्य कमिटीने बिबी केंद्रामध्ये भेट दिल्यानंतर केलेले कौतुक. या शैक्षणिक क्रांतीबद्दल त्यांना सन 2014 साली आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार प्राप्त झाला. कोणतेही कार्यक्रमातील सूत्रसंचलन मध्ये साहेबांच्या आवाजातील गोडवा एक वेगळीच अनुभूती देत असे
दोन्ही केंद्रामध्ये काम करताना साहेबांची एक वेगळी पद्धत होती प्रत्येक शिक्षकांना मित्रत्वाची वागणूक देत. साहेब शाळेवर आल्यानंतर शैक्षणिक अडचणी बरोबर घरगुती अडचणी विषयी चर्चा करायचे, मार्ग सांगायचे त्यामुळे आम्हा शिक्षकांना ते साहेबापेक्षा मित्रच जास्त जाणवले. कमीत कमी मीटिंग घेऊन, कमीत कमी कागदांचा वापर करून माहिती गोळा करणे हे साहेबांचे कौशल्य होतं. विद्यार्थ्यांमध्ये रमणारे साहेब होते.
खरंतर परमेश्वराने केवळ मानवालाच इतर सजीव घटकापेक्षा परिपूर्ण असं बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टीचा त्या संधीचा परिपूर्ण उपयोग शिंदे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये घडवून आणलेला दिसून येतो. उत्तम कार्य केल्यानंतर त्याचे फळही उत्कृष्ट मिळतंच यात काही शंका नाही. याचंच उदाहरण म्हणजे साहेबांचा एक मोठा मुलगा गौरव गजानन शिंदे मुधोजी हायस्कूल फलटण येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर दुसरा मुलगा ऋषिकेश गजानन शिंदे हा पुणे येथे B.S.C agri करत आहे. साहेबांची थोरली सून सौ.सोनाली गौरव शिंदे B.S.C.B.ed झालेल्या आहेत. आणि एक नातू अर्णव जो त्यांचा एक सच्चा मित्र आहे जो त्यांच्या अंगा खांद्यावर खेळतो.,रानात रमतो सेवानिवृत्तीनंतर रममान होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे अर्णव.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो तसेच शिंदे साहेब यांच्या आतापर्यंतच्या सर्व उल्लेखनीय कामात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री गजानन शिंदे या गृहिणी असून त्या प्रगत शेतकरी आहेत तसेच काही वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी राजकारणात स्वतःचा ठसा उमटवला आणि आज त्यांच्यासाठी दुग्धशर्करा योग म्हणजे आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच साहेब सेवानिवृत्त होत आहेत दोघा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक शुभेच्छा!!!
गजानन शिंदे साहेब हे घरात वडीलधारी असल्यामुळे त्यांचा आदर्श त्यांच्या भावांनी त्यांच्या मुलांनी घेतलेला दिसून येतो.जिथे आनंदातून आनंद जन्माला येतो तिथे सुखाचे नंदनवन तयार होते. असेच नंदनवन शिंदे कुटुंबांमध्ये निर्माण झाल्याचे आपणाला आजही दिसून येते.
ज्याप्रमाणेमहारोग्यांच्या जखमांवर उपचार करून त्यांच्यातील चैतन्य जागवणारे बाबा आमटे आनंदवनाची निर्मिती करतात. मंग याच युगातील एक गजानन आपल्या कुटुंबाचे “नंदनवन” एक वेगळ्याच प्रकारे करताना दिसून येतो.जशी अापण आपट्याची पानाने दसरा साजरा करतो, आंब्याच्या पानाने पाडवा साजरा करतो तसेच आदरणीय शिंदे साहेब नावाच्या पानाने आपल्या कुटुंबाचे आयुष्य एक चांगल्या प्रकारे साजरे केले आयुष्याला, कुटुंबाला सुंदर आकार देण्याचे काम त्यांनी केलेले दिसून येते.
शिंदे साहेब केंद्रप्रमुख असताना शाळा भेटीच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरती असणारे हास्य जणूकाही smile is the best medicine in the world असा कानमंत्र देवून जायचे. कोणतीही समस्या असली तरी वेळ काढून, समजून ते नेहमी सांगत असत. शैक्षणिक अडचणी संदर्भात फोन केला तरी ते अतिशय चांगल्या प्रकारे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ते माहिती तर देत असतात, पण कमीत कमी बोलणं आणि पुष्कळ ऐकून घेणे हा त्यांचा मला आवडलेला एक गुण आहे.आणि त्याचबरोबर ते मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम नेहमी करत असतात
31मे 2021रोजी आदरणीय गजानन शिंदे साहेब आपल्या 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. खरंतर आजही त्यांच्याकडे पाहिलं तर अजूनही कोणाला विश्वास बसणार नाही की ते सेवानिवृत्त होत आहेत.याचं कारण मला तर असं वाटतं की शिंदे साहेब हे सदैव आपल्या कामात आणि आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या माणसात आणि नंतर आपल्या शेतात वेळ घालवत असताना दिसतात.त्यामुळे चिंता हा विषय कधी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही.त्यामुळेच ते आजही तितक्याच जोमाने काम करताना दिसून येतात.
शासकीय नियमानुसार जरी साहेब सेवानिवृत्त होत असले तरी त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा अनुभवाचा फायदा आम्हाला नेहमी व्हावा.असं मनापासून वाटतं,शिंदे साहेब सेवानिवृत्त झाल्यामुळे फलटण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेली पोकळी हि न भरून निघणारी आहे. आदरणीय शिंदे साहेबांचे इथून पुढचे भावी आयुष्य हे सुखी समृद्धी भरभराटीचे ,उत्तम आरोग्याचे जावो व शतायुषी व्हावे.हिच श्रीराम चरणी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो.आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो. शेवटी एवढेच म्हणेल,
खुदी को कर बुलंद इतना की,
हर तकदीर से पहले
खुदा बंदे से खुद पुछे
बता तेरी रजा क्या है!
शब्दांकन…🖋️
श्री.गणेश भगवान तांबे उपशिक्षक जि.प.शाळा
कारंडेवस्ती( मलवडी)
केंद्र -बिबी