हसरे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले
सर्वांनाच निशब्द करणारी आज घटना घडली आमचे मित्र,सखा, सच्चा दोस्त विजय तरटे (सर) हे आज आपल्यात राहिले नाहीत
गेले कित्येक महिने कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर दिलेला लढा आज अखेर व्यर्थ ठरला
फलटण शहरापासूनच जवळ असणाऱ्या वाठार निंबाळकर या ऐतिहासिक गावातील तरटेवस्ती येथे सरांचे बालपण गेले अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये अपार कष्ट सरांनी व सरांच्या घरातील सर्वांनीच केले. सरांनीही जमेल तेवढे काम करून विविध शैक्षणिक पदव्या मिळवून स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमठवला होता. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती,परंतु सर्वांच्या अंगी काबाडकष्ट करण्याची प्रचंड तयारी होती त्यामुळे आज त्यांचे कुटुंब अत्यंत चांगल्या स्थितीत होते. रानातील हिरवेगार शिवार हे त्याचेच एक फलित होते. त्यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांचे थोरले बंधू राजाराम तरटे यांची त्यांना चांगली साथ मिळाली त्याचबरोबर त्यांचे घरातील सर्वांचे वातावरण खेळीमेळीचे होते.
वस्तीवरील यात्रा असो अथवा गावातील कोणताही कार्यक्रम असो तरटे सर प्रत्येक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असायचे. आमच्या तांबेवस्ती परिवारातील अत्यंत जवळचे कुटुंबातील एक सदस्यच सर होते.त्यांच्या चेहऱ्यावरती सदैव हास्य कायम असायचे हा त्यांचा अतिशय उत्कृष्ट असा गुण घेण्यासारखा होता कितीही कठीण प्रसंग आले तरी चेहऱ्यावर कधीही निराशा नव्हती. कठीण परिस्थितीवर जिद्द,चिकाटी आणि मेहनतीने मात करणे हा त्यांचा स्वभाव होता. हा स्वभाव सध्याच्या परिस्थितीमध्ये वेळोवेळी दवाखान्यात जात असतानाही आम्हा सर्वांना दिसून आला
फलटण एज्युकेशन संस्थेतील शेती शाळा या ठिकाणी सर सध्या कार्यरत होते. स्वतःच्या विषयावरती त्यांचे खूप प्रभुत्व होते. आणि त्याचा फायदा वर्गातील विद्यार्थ्यांना सतत होत होता. त्याचबरोबर सरांनी अनेक वर्ष यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे केंद्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालवले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून याचा भरपूर फायदा झाला. घरच्या परिस्थितीमुळे कित्येक विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडावे लागले होते.परंतु मुक्त विद्यापीठामुळे आज ते विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. आमच्या प्राथमिक शिक्षक बांधवांना तर बारावी नंतर D.ed झाल्यामुळे पदवी पूर्ण करणे शक्य नव्हते.परंतु आदरणीय सरांच्या मुळे कित्येक जण आज पदवीधर झाले आहेत
कोणत्याही विद्यार्थ्यांचा काही प्रश्न असो, फोन असो, सर नेहमी किती व्यापात असले तरी ते योग्य उत्तर दिल्यानंतरच थांबत असत
वाठार निंबाळकर गावातील अथवा तरटेवस्ती वरील सामाजिक कार्यामध्ये त्यांचा चांगला ठसा होता. फलटणच्या राजघराण्यातील अत्यंत एकनिष्ठ व विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सरांची कार्य करण्याची पद्धती अतिशय वेगळी होती आणि त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चितपणे पार पाडायचे. सरांच्या प्रत्येक कामात त्यांच्या सुविद्य पत्नीने मोलाची अशी साथ दिली
दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सरांना सहकार्य करणारे असंख्य मित्र परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. फलटणच्या राजघराण्यातील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर( महाराज साहेब), श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा),श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी प्रत्येक वेळी दवाखान्यासाठी केलेल्या सहकार्यामुळे, प्रयत्नामुळे त्यांना पुनर्जन्मच मिळाला होता. काही महिने चांगले गेले परंतु नशिबाची साथच त्यांना मिळाली नाही सरांना आयुष्यामध्ये अजून खूप काही करायचे बाकी होते मुलगा व मुलगी लहान त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची धडपड होती.तसेच एकत्र कुटुंबातील सर्वांचीच काळजी त्यांना होती त्यामुळे सरांच्याकडे जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. त्या इच्छाशक्तीच्या जोरावरच त्यांनी या दुर्धर आजारावर मात मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो यशस्वी झाला नाही
आज सरांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती तसेच मित्रपरिवार यांच्यावरती अत्यंत दुःखाचा डोंगर उभा राहिलेला आहे. सरांचे अचानक जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे.दुःखाच्या या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे सर आपणाला कायमचे सोडून देवाघरी गेले……..
सर…. हि निघून जाण्याची वेळ नव्हती…..
भावपूर्ण श्रद्धांजली*
आपलाच – गणेश तांबे