फलटण येथे बुधवारी मोफत म्युकरमायकोसीस रोगनिदान शिबीराचे आयोजन

फलटण : 
फलटण डॉक्टर्स असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन बारामती शाखा व फलटण शाखा यांच्यातर्फ बुधवार दि. २६ मे रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत अनंत मंगल कार्यालय, कोळकी ता फलटण येथे मोफत म्युकर मायकोसीस रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना आजारात वापरण्यात आलेली स्टिरॉइड्स, अनियंत्रित असणारा मधुमेह, यामुळे रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन त्यांना कोरोना पश्चात म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे, हा बुरशीजन्य आजार अतिशय घातक असून यामध्ये सुमारे ४० ते ८० टक्के मृत्युदर आहे, काही रुग्णांची दृष्टी कायमची जात आहे, तर काही रुग्णांचे नाक व जबड्याचे हाड काढून टाकावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर मोफत रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.
या रोगाच्या काही प्राथमिक लक्षणांमध्ये दात दुखणे, दात हालणे, हिरड्यांना सूज व पू येणे, तोंडाचा घाण वास येणे, चेहऱ्यावर, जबड्यावर सूज येणे, नाकातून काळा किंवा लालसर द्रव येणे, नाक चोंदणे, डोळ्याच्या भोवती व टाळूवर काळे चट्टे पडणे, ताप येणे, डोळे लाल होणे, एकच वस्तू दोनदा दिसणे, डोकेदुखी वगैरेंचा समावेश आहे.
कोरोना प्रमाणेच याही आजारावर, लवकर निदान आणि लवकर योग्य उपचार हाच एकमेव पर्याय उपयोगी ठरत आहे, वेळीच निदान केले तर आपण या आजाराला नक्कीच प्रतिबंध घालू शकतो याची ग्वाही देत त्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
 ज्या लोकांना दि. १ एप्रिल नंतर कोरोनाची लागण झाली आहे आणि ज्यांना वरील प्रकारची कोणतीही लक्षणे आहेत, तसेच ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे अशा सर्वांनी या शिबीरात सहभागी व्हावे ज्या रुग्णांना या शिबीराचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी https://forms.gle/LatvJH41MpU5o3QH6 या दिलेल्या लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरुन मंगळवार दि. २५ मे २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!