सातारा, दि. 17(जिमाका) : खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्विंटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या वर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या खरीप हंगामात शेतकरी खते व बियाणांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने आली तरी राज्यासह देशात कृषी उत्पन्न वाढले आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विकला आहे. तरी शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करुन देण्यावर कृषी विभागाने भर द्यावा. तसेच खतांचा अधिकचा स्टॉक करुन ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीत केल्या.
खंडाळा, फलटण व माण तालुक्यात उन्हाळी कापूस पिक घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करुन देण्याबरोबरच खरेदी, विक्री केंद्र सुरु करण्यात यावे, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.
खरीप हंगामात खासगी बँकांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करुन, दिलेले कर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.
या बठकीचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले. यावेळी विभागीय व्यवस्थापक दिलीप झेंडे सहाय्यक व्यवस्थावक राहुल पवळे,अमरसिंह निंबाळकर उपस्थित होते .