नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तेथील जनतेने धाडसाने धर्मांध शक्तीला विरोध करून सामान्य लोकांचे जे मानसिक बळ वाढविले त्याची बीजे ब्रिटीश काळात इंग्रजाची सत्ता असूनसुद्धा सामाजिक प्रबोधनाची जागृती करणारे समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्या सामाजिक क्रांतीमध्ये होती. त्या राजा राममोहन रॉय यांचा सामाजिक सुधारणा, धर्माची चिकित्सा आणि शिक्षण व पत्रकारिता याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाचे दालन सुरू करण्यात पुढाकार घेतलेले ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज 175 वी पुण्यतिथी आहे.
19 व्या शतकाची सुरूवातीची 18 वर्षे झाल्यानंतर महाराष्ट्रात (तत्कालिन मुंबई इलाख्यात) छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या रयतेच्या हिंदवी साम्राज्याचे प्रधान पेशवे यांची कारकिर्द ब्रिटीश सरकारने खालसा केली. (1818) त्या काळात या राजवटीतील काही प्रधानांनी पराक्रमाची शर्थ करून अटकेपार हिंदवी स्वराज्याचे झेंडेही लावले, काहींनी मोगल आणि इंग्रज यांच्या साम्राज्यवादी दहशतवादास यशस्वी टक्करही दिली. यामध्ये थोरले बाजीराव, माधवराव पेशवे, सवाई माधवराव, राघोबादादा असे मोजके प्रधान पेशवे यांनी शर्थीने राज्य राखण्याचे प्रयत्न केले. परंतु नंतर मात्र आलेल्या पेशव्यांनी राजधर्म विसरून धर्मांध शक्तींना जवळ केले व सनातनी धर्म, तो कसाही चालविणारे पंडित आणि विलासीपणाचे ऐश्वर्य जवळ केल्यामुळे बेधुंद गाफील राहिले आणि ब्रिटीशांच्या सत्तेचा उदय झाला. त्याकाळात ‘‘आपले राज्य कां गेले आणि इंग्रजांचे राज्य का आले याचे अचूक निदान करणारा महाराष्ट्राचा पहिला तेजस्वी ज्ञानपुरुष म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर’’ असे यथार्थ वर्णन प्रख्यात साहित्यिक कै. प्र. के. अत्रे यांनी केले होते. त्या बाळशास्त्री जांभेकरांची कारकिर्द 1825 पासून मुंबईमधून सुरू झाली.
बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म कोकणातील अत्यंत दुर्गम अशा पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग या खेड्यातील जांभे देऊळवाडीमधील एक पुराणिक गंगाधरशास्त्री यांच्या पोटी 20 फेब्रुवारी 1812 रोजी झाला. वडिल गंगाधरशास्त्री व मातोश्री साध्वी सगुणाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे घरगुती व प्राथमिक शिक्षण वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत झाले. त्यामध्ये मराठी सुलेखन, वाचन, व्यावहारिक गणित, तोंडी हिशोब, रामदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, वामन, मोरोपंत, इत्यादींच्या ओव्या, आर्या, कविता, रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांच्या बखरी, इत्यादी अभ्यासाचा समावेश होता. मौजीबंधन (व्रतबंध) झाल्यानंतर वेदपठण, पुराणे, उपनिषदे, भगवद्गीता, भागवत, अमरकोश, लघु कौमुदी, पंचमहाकाव्ये, विविध संस्कृत स्तोत्रे व उपासना इत्यादींचे अध्ययन बारा वर्षापर्यंतच पूर्ण झाले. त्यामुळे त्यांची एकपाठी अभ्यासातील घनता पाहून त्यांचा परिसरात ‘बालबृहस्पती’ असा लौकिक झाला. आणि त्यानंतर त्यांचे नातेवाईक सदाशिव काशिनाथ उर्फ बापू छत्रे की जे, गव्हर्नर लॉर्ड माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी मुंंबईमध्ये 1822 मध्ये स्थापन केलेल्या दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल, बुक अॅण्ड स्कूल सोसायटी या शिक्षण व पुस्तक प्रकाशन संस्थेत, नेटिव्ह सेक्रेटरी (एतद्देशीय सचिव) होते. त्यांच्यामुळे बाळशास्त्री जांभेकर 1825 च्या उत्तरार्धात मुंबईमध्ये पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. बालवयातील बाळशास्त्री यांची शिक्षणातील झेप व प्रखर बुद्धिमत्ता रामचंद्रशास्त्री जानवेकर (बाळशास्त्रींच्या मोठ्या बहिणीचे यजमान) यांच्यामार्फत छत्रे यांच्या कानावर गेली होती. त्यांना बाळशास्त्रींच्या वडिलांनी विनंती केली की, बाळशास्त्रींचे (बाळाचे) पुढील शिक्षण इंग्रजीतून व्हावे. म्हणून बाळशास्त्रींना छत्रे यांनी आपल्या संस्थेतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला (1825). इथे त्यांना रॉबर्ट मर्फी हा तरुण आयरिश लष्करी अधिकारी मुख्याध्यापक होता.
बघता बघता बाळशास्त्रींच्या इंग्रजी भाषेच्या शिक्षणाचीही तडफ, इतिहास, भूगोल, गणित व शास्त्र या विषयातील प्राविण्य सोसायटीचे प्रमुख सचिव कॅप्टन जॉर्ज सर्व्हिस यांचेमार्फत गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन यांच्यापर्यंत पोचले. म्हणून बाळशास्त्री विद्यार्थी दशेत 3 वर्षाचेच शिक्षण असताना त्यांची त्याच शाळेत गणित अध्यापक म्हणून (द.म.रु. 15 मानधन) नियुक्ती झाली. आणि येथूनच ‘बाळशास्त्री जांभेकर’ या नावाचे पर्व सुरू झाले. बाळशास्त्रींची अगदी अल्पवयातली ही झेप व त्यांच्यावरील सर्वच वरिष्ठ इंग्रज अधिकार्यांची मर्जी लक्षात घेऊन आपला हाच वारसदार होऊ शकेल या भावनेतून छत्रे यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे शब्द टाकला की बाळशास्त्रींना सोसायटीचे माझ्या जागी सचिव म्हणून नियुक्ती करावी. म्हणून बाळशास्त्री यांनी 20 फेब्रुवारी 1830 रोजी सोसायटीकडे सचिव पदासाठी स्व हस्ताक्षरात इंग्रजीमध्ये अर्ज केला. दरम्यानच्या काळात त्यांनी मराठीबरोबरच संस्कृत, इंग्रजी, गुजराथी, बंगाली, कानडी, फारसी, फे्रंच, इत्यादी 14 भाषांमध्ये प्राविण्य मिळवले होते. अंकगणित, बीजगणित, भूमिती, महत्त्वमापन, लॉगॅरिथम, इंग्रजांचा इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, विज्ञान, भारतीय व पौर्वात्य संस्कृती यांच्याही अभ्यासात प्राविण्य मिळवले होते. सोसायटीकडे केलेल्या अर्जात हे सारे त्यांनी नमूद केले होते व मला मुलाखतीला बोलवाल तेव्हा ही सारी गुणवत्ता सिद्ध करण्यास मी तयार आहे असेही लिहिले होते. केव्हढा हा आत्मविश्वास ! (आमच्या तरुणांना हे पत्र व हा आत्मविश्वास आदर्श असा आहे). बाळशास्त्रींची विद्वत्ताच एवढी मोठी की, मुलाखत न घेताच सोसायटीचे नवीन सेक्रेटरी रॉबर्ट कॉटन मनि यांनी त्यांची निवडच केली. पण ब्रिटीशांच्या सरकारी नियमानुसार या पदासाठी 20 वर्षे वय असायला पाहिजे होते. आणि बाळशास्त्री यावेळी 18 वर्षाचे म्हणजे त्यांच्या दृष्टीने अल्पवयीन होते. म्हणून सोसायटीने त्यांना मार्च 1830 मध्ये डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी पदावर (सहाय्यक एतद्देशीय सचिव) द.म.रु. 50 पगारावर नेमणूक केली. त्या संस्थेत फक्त पाचच वर्षे ते विद्यार्थी होते व हा विद्यार्थी आणि तोही भारतीय, त्याच संस्थेत उच्चपदस्थ पदाधिकारी होतो ही त्या संस्थेतील (ब्रिटीशांच्या) ऐतिहासिक अशी पहिलीच घटना होती. पुढे त्यांचे काम, कर्तृत्व व संस्थेबद्दलची व शिक्षणाबद्दलची नवी दृष्टी लक्षात घेऊन मार्च 1832 पासून त्यांना द.म.रु. 100 पगारावर त्या सोसायटीचे पूर्णवेळ नेटिव्ह सेक्रेटरी (एतद्देशीय सचिव) म्हणून नियुक्त करण्यात आले ते त्यांच्या निधनापर्यंत कायम (17 मे 1846). या अवघ्या 16 वर्षातच बाळशास्त्री यांनी आपले आयुष्य तत्कालिन महाराष्ट्रातील, पहिला समाजसुधारक, पहिला मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’चा संपादक, पहिल्या मराठी मासिकाच्या ‘दिग्दर्शन’ चा संपादक अशा विविधांगी कर्तृृत्वाने सिद्ध केले.
वैचारिक द्रष्टेपण ः
पारतंत्र्यात असूनसुद्धा आणि ब्रिटीशांच्या सेवेत असूनसुद्धा बाळशास्त्रींनी आपले वैचारिक द्रष्टेपण सिद्ध केले. आपले लोक सुशिक्षित, पाश्चात्यांच्या सुधारणांचा अभ्यास यातूनच देशप्रेमाची जागृती करू शकतील यावर त्यांचा विश्वास होता. बंगालमधील लोकांची प्रगती या आधुनिक शिक्षणामुळेच झाली. त्यामुळेच सामाजिक व धार्मिक सुधारणांची गरज लोकांना शिक्षण, वृत्तपत्रे या माध्यमातून पटू लागली. तीच गरज महाराष्ट्रात आहे हे त्यांनी ओळखले आणि सामाजिक सुधारणा, धर्मचिकित्सा यासाठी ते आग्रही राहिले. हिंदू धर्माचा अभिमान असूनसुद्धा त्यातील बाल विधवा केशवपन, सतीची चाल, स्त्रियांना शिक्षण न देणे, विधवांचा पुनर्विवाह न करणे अशा अनेक चालीरिती, रूढी, परंपरा या धर्मात सांगितल्या नाहीत हे त्यांचे आग्रही प्रतिपादन हिंदू धर्मातील कर्मठ सनातन्यांना आवडले नव्हते. धर्माच्या नावाखाली स्त्रियांचा छळ कसा चुकीच्या पद्धतीने होत आहे हे त्यांनी आपल्या ‘दर्पण’ मधून समाजाच्या नजरेस आणले हे त्यांचे धाडसच होते. हिंदू धर्म आणि सती (4/5/1832), स्त्रियांना विद्याभ्यास (21/9/1832), मुंज मुलींची कां नाही ? (2/5/1832), स्त्री पुरुषांना समान हक्क (23/5 व 6/6/1834), स्त्री शिक्षणाची दिशा (30/5/1834), दुराग्रही चालीवर झोड (6/6/1834), विधवांचा पुनर्विवाह (15/8/1837) हे त्यांचे ‘दर्पण’ मधील लेख महाराष्ट्रातील समाजसुधारणा क्षेत्रातील पहिली दिशादर्शक पाऊले आहेत. हिंदू धर्मातील एक तरुण ब्राह्मण श्रीपती शेषाद्रि त्याला जबरदस्तीने ख्रिश्चन धर्माची दिक्षा दिली होती. बाळशास्त्रींना हे कळताच त्यांनी यावर टिकेची झोड उठवली व श्रीपती शेषाद्रिला परत हिंदू धर्मात आणले. पण कर्मठ सनातनी हिंदू पंडितांना हे आवडले नाही आणि अनेक धर्म मार्तंडांनी बाळशास्त्रींना दोषी ठरवले. पण बाळशास्त्रींनी खुद्द शंकराचार्यांनाच याचा जाब विचारून हिंदू धर्मात न घेण्याबद्दलचा शास्त्राधारच विचारला. त्यामुळे खुद्द शंकराचार्यांनी (करवीर धर्मपीठ) व नाशिक, वाराणसी येथीलही अनेक विद्वान शास्त्रींनी बाळशास्त्रींच्या निर्णयास पाठिंबा दिला. अखेर श्रीपती शेषाद्रिला हिंदू धर्मात घेतले. यासाठी त्यांनी मुंबई सुप्रीम कोर्टातही यशस्वी लढा दिला. सामाजिक प्रबोधनाचे ते महाराष्ट्राचे अग्रदूतच ठरले. सामाजिक सुधारणा व प्रबोधन याचा मार्ग शिक्षणातूनच प्रशस्त होतो हेच बाळशास्त्रींनी दाखवून दिले. पुढे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षि कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरूजी, विनायक दामोदर सावरकर, संत गाडगे महाराज, इत्यादी नामवंत समाज सुधारकांनी बाळशास्त्रींनी दाखवलेल्या समाज सुधारणेचा मार्ग सामाजिक सुधारणांचा महामार्ग केला.
अनेक क्षेत्रातील कर्तृृत्वाचे पहिलेपण….
मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले भारतीय मराठी प्रोफेसर, कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी प्रभारी संचालक, मुंबईतील मराठी गरीब विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह संचालक, शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठीची कल्पना सुचविणारे आणि ब्रिटीश सरकारने प्रथम स्थापन केलेल्या अशा पहिल्या प्रशिक्षण विद्यालयाचे पहिले संचालक, रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नल्समधून पुरातत्त्व संशोधक म्हणून 90 शोधनिबंध प्रसिद्ध करणारे पहिले भारतीय संशोधन लेखक, पाठभेदयुक्त ‘ज्ञानेश्वरी’चे प्रथमच शिला प्रेसवर प्रकाशन करणारे पहिले मराठी प्रकाशक, बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी ह्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक, सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी लोकशिक्षणाचा एक भाग म्हणून मुंबईत पहिलेच सार्वजनिक व्यासपीठ म्हणून नेटिव्ह इंप्रूव्हमेंट सोसायटीचे संस्थापक, ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ मधून मराठी ग्रंथाचे समीक्षण करणारे पहिले मराठी समीक्षक, शालेय शिक्षणासाठी उपयुक्त अशा पाठ्यपुस्तकांचे पहिले मराठी प्रकाशक, अशा अनेक क्षेत्रातील पहिलेपणाचे कर्तृत्व बाळशास्त्रींनी अवघ्या 16 वर्षात सिद्ध केले.
बाळशास्त्रींची शतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यतिथी ः
अशा या महाराष्ट्राचे आद्य समाज प्रबोधक व मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची 175 वी पुण्यतिथी म्हणजे शतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यतिथी वर्ष आज 17 मे पासून सुरू होत आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी हे महोत्सवी वर्ष ‘‘पत्रकार प्रबोधन वर्ष’’ म्हणून विविध कार्यक्रमांनी संपन्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठी वृत्तपत्रांच्या व सार्वजनिक वाचनालयांच्या कार्यालयातून व सर्व शिक्षणसंस्थां मधून आज आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या छायाचित्रास आदरांजली वाहून या ‘पत्रकार प्रबोधन’ वर्षाचा सर्वांनी शुभारंभ करावा असे आवाहन करीत आहोत. कोव्हिड-19 ची परिस्थिती महाराष्ट्रात आरोग्यदृष्ट्या सुधारल्यानंतर शासन निर्देशानुसार महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी वर्षभर राज्याच्या विविध भागात चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद, तरुणांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धा, इत्यादी माध्यमातून विविध प्रबोधन कार्यक्रम आयोजित करणार आहे. त्यासाठीही सर्व वृत्तपत्रे, संपादक, वार्ताहर, स्तंभलेखक, समाजमाध्यमे, शिक्षण व साहित्य संस्था यांनी सहकार्य करावे असेही आवाहन करीत आहोत.
लेखक ः रविंद्र बेडकिहाळ,
अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी
फलटण, जि.सातारा