बारामती:
कोरोनाने सगळीकडे कहर मांडला आहे.अनेकांचे जीव जातायेत.कुणाला बेड मिळत नाही तर कुणाला अॉक्सिजन मिळत नाही तर कुणाची रेमडेसिव्हिरसाठी धावपळ चालू आहे.अशाही परिस्थितीत सरकारी यंत्रणा ,खाजगी यंत्रणा लोकांना मदतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
संंकट भीषण आहे.परंतु हतबल होऊन चालणार नाही.एकमेकांना दोष देण्याची तर अजिबात वेळ नाही. *एकमेकांना मदतीचा हात देऊन संकटातून बाहेर काढण्याची वेळ आहे.* एकजुटीच्या प्रयत्नांची गरज आहे.टिका टिप्पणी न करता माणसांना वाचविण्याची वेळ आहे.
आज सोशल मिडिया जणू काही आपली जीवनावश्यक गरज बनली आहे. संदेशांची देवाणघेवाण करण्याचे एक चांगले माध्यम म्हणून त्याचा वापर केला जातो.परंतु *लोकांच्या मनात भीती निर्माण होणारे संदेश पसरवून आपण काय साध्य करतो?*
याचाही विचार केला पाहिजे.टाळेबंदीमुळे माणसं घरात बंद आहेत.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.जगायचं कसं असा अनेकांना प्रश्न पडला आहे. सतत घरात राहून माणसांच्या मनावर मानसिक ताण तणाव निर्माण होत आहेत.घरात वेळ घालविण्यासाठी टिव्ही मोबाईलचा वापर वाढला आहे.बाहेर जाता येत नसल्याने मुलेही घरात राहून कंटाळली आहे.पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने त्या मुलांना थोडेसे हायसे वाटत असेल पण बारावीच्या मुलांना परीक्षेची चिंता आहे.एकंदरीत सगळी परिस्थिती मानसिक ताण तणाव वाढविणारी आणि माणसाला नैराश्याच्या गर्तेत ढकलणारी आहे.
अशा वेळी आपण सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे.लोकांच्या मनात भय निर्माण होणाऱ्या संदेशांची देवाणघेवाण टाळली पाहिजे.या भीतीच्या वातावरणात माणसाचे मनोधैर्य कसे वाढेल ,या संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य कसे निर्माण होईल ,आपली आणि कुटुंबाची काळजी कशी घेता घेईल,एकमेकांना मानसिक आधार देऊन सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करता येईल अशा पद्धतीचे संदेश पाठविले तर नक्कीच
*कोरोनाची लढाई लढताना माणूस खचून न जाता , मनात भीती न बाळगता लढेल आणि जिंकेलही.*
घरात राहून आपण सोशल मिडियाचा सकारात्मक वापर करु.लोकांच्या मनातील नकारात्मकता घालविण्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांशी बोलून आधार देऊ. विविध छंदात स्वतःला आणि घरातील व्यक्तीना गुंतवून घेऊ.
*या काळात घरातील वातावरण आनंदी आणि भयमुक्त कसे ठेवता येईल याकरिता प्रयत्न करु.*
*आपले मन जसे विचार करते तसे आपले वर्तन घडते*.काळ आपली परीक्षा पाहणारा आहे.आपल्याला या संकटावर मात करुन पुढे जायचे आहे.त्यासाठी समाजात पसरत चाललेली नकारात्मकता ,भीती दूर करण्यासाठी आपण हातभार लावूया.कारण नकारात्मकता आपला मोठा शञू असतो.
*तुम्ही जेवढे सकारात्मक आणि आशावादी राहाल तेवढे तुम्ही मजबूत आणि कणखर बनाल.* आणि हीच कणखरता तुम्हाला संकाटावर मात करण्यासाठी कामी येईल.
माणूस हा संकटाने हतबल होणारा प्राणी नाही .तो शूर आहे ,लढवैय्या आहे.आज सर्व शक्तिनिशी तो कोरोनाची लढाई लढतो आहे.ही लढाई एकट्या दुकट्याची नसून संपूर्ण मानवजातीची आहे.ही लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाच्या मनात सकारात्मक ऊर्जा असायला हवी.
*कारण मनातून हरलेला कधीच जिंकू शकत नाही.*
*चला तर मग सगळीकडे सकारात्मक ऊर्जा पसरवूया*