फलटण दि.२३ : स्वतःच्या कंपनीतील सुमारे ३०% उत्पादन थांबवून तेथील ऑक्सिजन प्लॅन्ट खाजगी रुग्णालयात स्थलांतरीत करुन काही प्रमाणात फलटण मधील कोरोना बाधीतांची ऑक्सिजनची गरज भागविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), मॅग्नेशिया कंपनीचे डायरेक्टर, टेक्निकल अधिकारी, कर्मचारी यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडतील, अशी भावना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधून व्यक्त होत आहे.
कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेडस आणि अन्य साधने सुविधा कमी पडत असताना गेले २/४ दिवसांपासून ऑक्सिजन आणि रेमडीसीवर इंजेक्शनच्या तुटवड्यावर संपूर्ण राज्यभर सर्व स्तरावर सुरु असलेले प्रयत्न आणि त्यातून उपलब्ध झालेले इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन पुरेसा नसला तरी दिलासा देणारा ठरत असल्याने काही प्रमाणात समाधान व्यक्त होत असताना वाढती रुग्ण संख्या धोकादायक परिस्थिती निर्माण करीत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
फलटण येथील महाराजा मालोजीराव रौप्य महोत्सवी रुग्णालय संचलित लाईफ लाइन हॉस्पिटल मधील वाढती कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आणि त्यासाठी आवश्यक वैद्यकीय साधने, सुविधा विशेषतः ऑक्सिजन आणि इंजेक्शन पुरवठ्यासाठी हॉस्पिटल प्रशासन अक्षरश मेटाकुटीला आले आहे. ऑक्सिजन कोठूनही उपलब्ध होत नसल्याने शासन/प्रशासन हतबल झाले आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी आपल्या तरडगाव ता.फलटण येथील मॅग्नेशिया कंपनीतील ३०% उत्पादन कमी करुन तेथील ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट महाराजा मालोजीराव रौप्य महोत्सवी रुग्णालय संचलित लाईफ लाइन हॉस्पिटल, फलटण येथे स्थलांतरित करुन ताशी २ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर निर्मितीची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान लोणंद येथील औद्योगिक वसाहतीमधील सध्या बंद असलेल्या सोना अलाईज कंपनीमधील ऑक्सिजन उत्पादन प्लॅन्ट सुरु करण्याच्या दृष्टीने आपण कंपनी व्यवस्थापन आणि जिल्हाधिकारी सातारा यांची बोलणी करुन दिली आहेत. प्रशासन व कंपनी यांच्यामधील चर्चा यशस्वी झाली तर तेथून दररोज २१ टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी निदर्शनास आणून दिले आहे.