पोलीस भरती 3 वर्षे न झाल्यामुळे सरकारचा निषेध

बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ):
महाराष्ट्रामध्ये सन 2018 नंतर पोलीस भरती घेण्यात आली नाही. पोलीस भरती घेण्यासंदर्भात गृहमंत्री व इतर मंत्र्यांकडून घोषणा खूप झाल्या, परंतु अद्यापपर्यंत पोलीस भरतीची तारीख जाहिर झाली नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये पोलीस भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घेण्यात आले, परंतु त्याचीही पुढे कोणतीही प्रक्रिया राबविली गेली नाही. पोलीस भरतीची तयारी करणारे बहुसंख्य उमेदवारांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, बहुसंख्य मुले ही कष्टकरी, शेतकरी, मजुरांची आहेत. ही मुले शहराच्या ठिकाणी राहून अभ्यास करतात, क्लास लावतात, पुस्तके व मेस इत्यादीचा होणारा मोठा खर्च त्यांना पेलवत नाही. ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे, विद्यार्थी नैराशात गेलेले आहेत, आत्महत्याच्या भाषा करु लागले आहेत, पालकसुद्धा पूर्ण खचून गेले आहेत. 
महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात MPSC ची परीक्षा घेतली जाते, आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात, रेल्वे व इतर केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, निवडणूका घेतल्या जातात. एवढ्या सर्व बाबी राबवल्या जात असताना फक्त पोलीस भरतीच का घेतली जात नाही? असा उदविग्न सवाल महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी विचारू लागले आहेत.
पोलीस भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर व एकाच वेळी जाहिर केलेल्या 12528 पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जावी. ही भरती प्रक्रिया न राबविल्यास महाराष्ट्रभर सोशल मिडियाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणाचा निषेध केला जाईल व सरकारी प्रतिनिधींना निवेदने देऊन लवकरात लवकर भरती करण्यासाठी भाग पाडले जाईल. गरज पडल्यास खूप मोठे आंदोलनही केले जाईल अशी माहिती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वतीने  बारामतीचे पोलीस भरती मार्गदर्शक उमेश रुपनवर यांनी दिली.
पहिल्या टप्प्यामध्ये दिनांक 21 मार्च  ते 27 मार्च या कालावधीमध्ये सर्व मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणाचा निषेध केला जाईल. तसेच 25 मार्च रोजी महाराष्ट्रात पोलीस भरती न झालेल्या घटनेला 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रतिकात्मक स्वरुपात केक कापून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला जाईल आणि त्याचे ट्विट CMO महाराष्ट्रापासून सर्व मंत्र्यांना केले जाईल. तसेच तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, डम्बलर, गुगल प्लस यांसारख्या सर्व सोशल मिडिया नेटवर्कवर हस्टॅग माहिम महाराष्ट्रवर राबविली जाईल. एवढे करूनही सरकारने पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली नाही तर दुसरा टप्पा हा 28 मार्च  ते 10 एप्रिल  या कालावधी दरम्यान राबविला जाईल आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालये, तहसिल कार्यालये यांना पोलीस भरती करण्याबाबतची निवेदने कोरोनाचे नियम पाळून दिली जातील. एवढे करुनही सरकारने प्रतिसाद दिला नाही तर, शेवटी तमाम पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरुपात आंदोलन केले जाईल. अशी माहिती बारामतीचे पोलीस भरतीचे मार्गदर्शक उमेश रुपनवर यांनी दिली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!