फलटण दि.२४ :
सत्ताधारी संचालक मंडळाच्या उत्तराकडे लक्ष.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि, सातारा येथील वार्षिक सभा २८ मार्चला आॅनलाईन पध्दतीने होणार आहे. त्यामुळे बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेश बोराटे व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष, राजेश शिंगाडे यांच्या उपस्थितीत शाखा व्यवस्थापक प्रमोद परामणे यांच्याकडे लेखी प्रश्नावली सादर केली आहे. या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आॅनलाईन होताना दिसत आहेत. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि, सातारा बँकेची सभा ही आॅनलाईन होणार आहे.
बँकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत विरोधक सत्ताधार्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात हा इतिहास आहे. राजेश बोराटे यांनी लेखी प्रश्नावली देऊन सत्ताधार्यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
राजेश बोराटे यांनी सत्ताधारी संचालकांना १० प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न खालीलप्रमाणे.
१) जुलै २०१९ मध्ये सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि, सातारा मध्ये किती जागांसाठी नोकर भरती केली व प्रत्यक्षात किती जणांना नोकरी भरतीचे आदेश दिले त्यांची सर्वांची नावे व पदे सांगा?
२) जुलै २०१९ मध्ये भरती झालेल्या कर्मचार्यांचा निकाल घोषित करा. किती मुले-मुली परीक्षेला बसली, किती पास झाली, तोंडी परीक्षेस किती पास झाली व अंतिम निवड किती जणांची झाली याची सविस्तर माहिती मिळावी?
३) २ फेब्रुवारी २०१३ रोजी नोकर भरती केलेल्या कर्मचार्यांपैकी किती कर्मचार्यांना नोकरीवरून कमी केले, याचे कारण स्पष्ट करावे?
या कमी केलेल्या कर्मचार्यांपैकी किती कर्मचार्यांना परत कामावर रूजू करून घेतले? त्यांना कामावर रूजू करून घ्यावयाचे होते तर त्यांना अगोदर कामावरून का कमी केले?
४) ८ जुलै २०१९ च्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा प्रशासकीय/कर्जे/सक्यू नं. १५८/२०१९/२० जावक नंबर ३३२ दिनांक ०८/०९/२०१९ नुसार सेवानिवृत्त सभासदांना वयाच्या ७५ वर्षापर्यंत कर्ज मर्यादा आठ लाख रूपये असताना शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सिध्देश्वर पुस्तके सभासद नंबर ६५७५ सेवानिवृत्त असूनही त्यांनी कर्ज मर्यादेचे उल्लंघन केलेले दिसत आहे. त्यांच्याकडे सेवानिवृत्तीनंतर १४,३२,९३८/-रूपये कर्ज दिसून येत आहे. याचाच अर्थ माजी चेअरमन सेवानिवृत्त झाले नंतर त्यांना वेगळा नियम व बाकीच्या सेवानिवृत्त सभासदांना वेगळा नियम का?
जर कर्ज मर्यादेचे उल्लंघन झाले असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करणार?
५) सन २०१८/१९ मध्ये आपले १०,२८९ सभासद, ११+१शाखा, १५८ सेवक असताना कामकाज सुरळीत चालते होते तर २०१९/२० मध्ये सभासद १०,२७८,११+१शाखा, १९१ सेवक म्हणजे ३१ सेवक जादा आहेत.
सभासद संख्या ११ ने कमी झाली असताना जादा कर्मचारी म्हणजे अनावश्यक नोकर भरतीची गरज होते का?
विद्यमान संचालक मंडळाने ४४ कर्मचार्यांची अनावश्यक नोकर भरती केल्यामुळे अनावश्यक नोकर भरती केलेले ४४ कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत बँकेवर किती रूपयांचा बोजा पडणार आहे ते सांगावे?
६) संचालक प्रवास भाडे व भत्यावरती सन २०१८ मध्ये २०,००,४७९.००तर सन २०१९ मध्ये १८,१३,६३१.०० तर सन २०२० मध्ये १७,६८,८०३.०० रूपये खर्च झाल्याचे दिसून येते.
सर्वसाधारण सरासरी या पाच/सहा वर्षात संचालक प्रवास भाडे व भत्यावरती १ कोटी १० लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे दिसून येते. हा खर्च कमी केला असता तर लाभांश २०% व व्याजदर एक अंकी ठेवता आला असता?
विद्यमान संचालक मंडळाने त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत प्रवास भाडे व भत्यावरती किती रक्कम खर्च झाली हे स्पष्ट करावे?
७) विद्यमान संचालक मंडळाने त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत किती कर्मचार्यांच्याकर्मचार्यांच्या बदल्या कधी व कोठे केल्या ते स्पष्ट करावे?
८) विद्यमान संचालकांनी अनावश्यक केलेल्या नोकर भरतीमध्ये आजी-माजी चेअरमन,आजी-माजी संचालक, संघटनेचे पदाधिकारी यांच्या किती मुलामुलींना नोकरीमध्ये भरती केलेले आहे हे स्पष्ट करावे?
९) सत्ताधारी संचालक मंडळाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आपणास एक अंकी व्याजदर का देता आला नाही हे स्पष्ट करावे?
१०) कोणकोणत्या मयत कर्जदार सभासदांचे किती कर्ज माफ केले ते स्पष्ट करावे?
मयत कर्जदार सभासदांचे सर्व कर्ज माफ करण्याचा उल्लेख आपल्या जाहीरनाम्यात असताना आपण ते का करू शकला नाही हे स्पष्ट करावे?
वरील प्रमाणे प्रश्न त्यांनी आपल्या लेखी पत्राद्वारे उपस्थित केले आहेत.
या प्रश्नांना सत्ताधारी संचालक मंडळ काय उत्तरे देतात, याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.
Thanks Very much.