फलटण दि.२० : फलटण शहरातील जुन्या महसूल कसबा चावडीचे बांधकाम धोकादायक झाल्याचे निदर्शनास आणून देत सदर इमारत नव्याने उभारणीसाठी आराखडे, अंदाजपत्रक, निधीची उपलब्धता, पुरातत्व खात्याची परवानगी आदी बाबी सतत २ वर्षे नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ.प्रगती कापसे यांनी पाठपुरावा केल्याचे नमूद करीत महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी या दोघांचे कौतुक केले.
मुधोजी मनमोहन राजवाडा व श्रीराम मंदिर परिसरातील जुन्या महसूल कसबा चावडीचे सुमारे १८ लाख रुपये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून निधी उपलब्ध करुन घेऊन पूर्ण करण्यात आल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), आ.दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), तहसीलदार समीर यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (फलटण) सहाय्यक अभियंता महेश नामदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या महसूल कसबा चावडीचे उदघाटन समारंभ पूर्वक करण्यात आले.
नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ.प्रगती कापसे यांच्या प्रभाग क्रमांक ६ मधील सदर कसबा चावडी इमारत मोडकळीस आल्याने धोकादायक स्थितीत उभी असताना तेथे तलाठी मंडलाधिकारी यांच्याकडे कामानिमित्त येणाऱ्या शहर व परिसरातील शेतकरी, घरमालक वगैरे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी महसूल खात्यामार्फत त्याबाबत प्रस्ताव दाखल करुन सदर इमारती नुतनीकरणाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली, सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत आराखडे अंदाजपत्रक तयार करुन घेऊन मंजुरीसाठी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे दाखल केला.
निधीच्या उपलब्धतेसाठी आ.दिपकराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन व विकास समितीकडे दाखल केला. दरम्यान सदर इमारत शहरातील जुन्या संरक्षीत वास्तू म्हणून जतन केलेल्या जबरेश्वर मंदिर परिसरात येत असल्याने पुरातत्व खात्याची त्या परिसरात बांधकाम करताना परवानगी आवश्यक असल्याने त्याबाबत आवश्यक कागद पत्र जमा करुन परवानगीसाठी मुंबई, दिल्ली येथून परवानगी घेण्यात आली त्यासाठीही या नगरसेवकांनी विशेष प्रयत्न केले.
उदघाटन समारंभास मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेविका सौ.प्रगती कापसे, महसूल मंडलाधिकारी, तलाठी व शहरवासीय उपस्थित होते. यावेळी कसबा चावडीचे काम करणारे ठेकेदार अनिल निंबाळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.