फलटण ( फलटण टुडे वृत्तसेवा) : शैक्षणिक,सामाजिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मानव विकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून जि. प. प्राथ. शाळा कांबळेश्वर केंद्र खुंटे येथील शिक्षिका माधवी गोसावी व जि.प. प्राथ. शाळा मदनेनायकुडेवस्ती केंद्र- निंभोरेचे उपशिक्षक, श्री.धन्यकुमार प्रल्हाद तारळकर यांची निवड करण्यात आली आहे.
मानव सेवा विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्था जिल्हा लातूर यांच्या वतीने ज्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या शैक्षणिक सामाजिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मानवी विकासात भरीव योगदान देणाऱ्या दोन व्यक्तीचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदा पुरस्कार वितरण सोहळ्याचे तिसरे वर्ष असून पुरस्कार वितरण सोहळा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजे ११ एप्रिल, २०२१ ला दयानंद सभागृह लातूर येथे आयोजित केला गेला असून पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते वितरण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास पद्मश्री तात्याराव लहाने, जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अमितभैय्या विलासराव देशमुख, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जि. प. लातूरचे अध्यक्ष राहुल केंद्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीची निवड केली आहे. यात सातारा जिल्ह्यातून माधवी गोसावी व धन्यकुमार तारळकर, प्राथमिक शिक्षक यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे तसेच करोना काळात शाळा बंद पण शिक्षण चालू, आकाशवाणी पाठ निर्मिती, टीचर मेंटर या उपक्रमामार्फत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण, ऑनलाईन व ऑफलाईन अध्ययन-अध्यापन, नवोपक्रमात सक्रिय सहभाग, स्वाध्याय उपक्रम, गोष्टींचा शनिवार हे सर्व उपक्रम राबवून उत्कृष्ट कार्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्कार निवडीबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (सभापती, विधान परिषद महाराष्ट्र राज्य), श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण)श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (मा.अध्यक्ष जि.प. सातारा) आमदार दीपकराव चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्काराचे सर्व श्रेय त्यांनी त्यांच्या मित्रमंडळी, सहशिक्षक, शिक्षक वृंद, नातेवाईक तसेच मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जिल्हा लातूर निवड समितीला दिले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, शिक्षक, विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.