फलटण – फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषि महाविद्यालय,फलटण येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मधुमक्षिका पालन प्रमाणपत्र शिक्षणक्रम व शेतकरी उत्पादक कंपनी प्रमाणपत्र
शिक्षणक्रमाचा उदघाटन समारंभ दि.०६ मार्च २०२१ रोजी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी साठ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. भारत हा कृषि प्रधान
देश आहे. आपल्या शेतीमधून मिळणारे उत्पन्न देशापुरते मर्यादीत न रहाता ते जास्तीत जास्त निर्यात करून
त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी विद्यापीठाने शेतकरी उत्पादक कंपनी प्रमाणपत्र शिक्षणक्रम
उपलब्ध केला आहे. तसेच आपला शेतमाल उत्पादन, प्रतवारी, मूल्यवर्धन, विक्री, निर्यात तसेच कृषि
निविष्ठा, प्रक्रिया व्यवसाय, अवजारे, बॅक, खरेदी केंद्र, कृषि जोडधंदे, शेतकरी सुविधा निर्माण करण्यासाठी
शेतकरी उत्पादक कंपनी शिवाय पर्याय नाही व यासाठी राज्य शासन व केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात
२०२३-२०२४ पर्यंत १०,००० एफ.पी.ओ स्थापन करण्यात येणार आहेत.
तसेच मधुमक्षिका पालन विषयी बोलताना ते म्हणाले, मधुमक्षिका पालन हा शेतीपुरक व्यवसाय
असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक सबलीकरण करणारा व त्याचबरोबर पर्यावरणाचा विकास करणारा अव्दितीय
उपक्रम आहे. या दोन्ही शिक्षणक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना व्यवसाय साक्षर करण्याचा प्रयत्न
असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी हा शिक्षणक्रम पुर्ण केल्यास त्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल.
यावेळी केंद्र संयोजक प्रा.ए.डी. पाटील बोलताना म्हणाले प्रत्येक कृषि उद्योजकाने व विद्यार्थ्याने सहभागी
व्हावे असे महत्वाचे प्रेरणादायी व व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण शिक्षणक्रम आहेत. या
शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेण्याची अंतीम तारीख १५ मार्च २०२१ असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या
संधीचा लाभ घ्यावा असे प्रतीपादन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा.ए.आर.फडतरे, प्रा.एस.बी. शेळके
तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.ए.एस. रासकर यांनी केले व सुत्रसंचालन
श्री.तेजस कुजीर यांनी केले.