कवी कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना रविंद्र बेडकिहाळ, बापूसाहेब मोदी, प्राचार्य शांताराम आवटे, ताराचंद्र आवळे.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मसाप फलटण शाखेच्यावतीने नामदेवराव सुर्यवंशी (बेडके)
महाविद्यालयास पुस्तके भेट देताना बापूसाहेब मोदी. समवेत रविंद्र बेडकिहाळ, प्राचार्य शांताराम आवटे.
फलटण : महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती याचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, त्याला सर्व मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला पाहिजे, अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
कवी कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा दिनानिमीत्त येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सुर्यवंशी (बेडके) महाविद्यालय व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण आयाजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापुसाहेब मोदी, मसाप फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, कार्यवाह ताराचंद्र आवळे, प्राचार्य डॉ. डी. आर. राऊत उपस्थित होते.
रविंद्र बेडकिहाळ पुढे म्हणाले, कुसुमाग्रज यांना मराठी साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळविणारे मराठीतील ते पाहिले साहित्यिक होत. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी सावरकरांनी इंग्रजी शब्दाला मराठी पर्यायी शब्द तयार केले पण सर्वच पर्यायी शब्द वापरणे आपल्याला जमले नाही. इंग्रजीचा प्रभाव दिडशे वर्षे आपल्यावर होता त्यामुळे काही इंग्रजी शब्द बोली भाषेत आले. असे जरी असले तरी, आपल्या अंगात मराठी भाषा भिनलेली आहे. आपल्याला कोणी चिमटा काढला तर पटदिशी आपल्या तोंडातून ‘आई ग’ किंवा प्रचंड भितीदायक वातावरण समोर आले तर ‘अरे बापरे’ असा मराठी शब्द आपल्या तोंडात येतो. आपण सर्वांनीच मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. जगातला प्रत्येक मराठी माणूस जिथे जिथे असेल तिथे तिथे तो मराठी भाषेत बोलला तरच खर्या अर्थाने मराठी भाषा ही जागतिक पातळीवर सर्वमान्य होईल, असेही रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
ताराचंद्र आवळे म्हणाले, इतर भाषांचे एवढे अतिक्रमण झाले आहे की आपण मराठीतून बोलताना इंग्रजी शब्दांचा अतिरेकी वापर करतो. खरं तर हे शक्य तेवढे टाळले पाहिजे. मराठी चांगले बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली मातृभाषा ही जगात पाचव्या क्रमांकावरची बोलली जाणारी भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे त्यासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज आहे, असेही आवळे यांनी नमूद केले.
यावेळी बापुसाहेब मोदी व डॉ.सतेज दणाने यांची भाषणे झाली.
प्रारंभी वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेच्या आजीव सदस्या सौ.वैशाली शिंदे यांचा मध्य रेल्वे सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रविंद्र बेडकिहाळ यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. बापुसाहेब मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण यांचे तर्फे नामदेवराव सुर्यवंशी (बेडके) महाविद्यालयास पंचवीस पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले. आभार मसाप फलटणचे कार्यवाह अमर शेंडे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.दयानंद बोडके यांनी केले.
यावेळी मसाप फलटणचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह बाळशास्त्री जांभेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक भिवा जगताप, अरुण खरात, प्रा.आनंद गायकवाड,,डॉ.तेजश्री रायते, संदेश बिचुकले, कल्याणी गावडे, वनिता कोळेकर, यशवंत पवार, दिपाली बागल, आरिफ तांबोळी, हरिष बेडके, मेघा अडसूळ, संतोष बोबडे, यांच्यासह साहित्यप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.