फलटण :- राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फलटण परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी फलटण परिसरातील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. जवळपास 50 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. प्रथम क्रमांक मिळविलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम अशा स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी निवृत्त कार्यकारी अभियंता उस्मान शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना उस्मान शेख यांनी ग्लोबल वॉर्मिंग या विषयावरती व्हिडिओ च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, भोजराज नाईक-निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम उपस्थित होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी दिली.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकामध्ये प्रा. शांताराम काळेल यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन हा सर सी. व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 मध्ये लावलेल्या “रामन इफेक्ट” या शोधा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व संशोधन संस्थांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो असे प्रतिपादन केले.
या स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत फडतरे व महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांच्या हस्ते झाले.
प्रमुख मार्गदर्शक, वक्ते निवृत्त कार्यकारी अभियंता उस्मान शेख यांनी ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळे अतिवृष्टी दुष्काळ अशा प्रकारच्या अनेक समस्या कशा प्रकारे येऊ शकतात याबाबतचे मार्गदर्शन केले. उपस्थितांना वातावरणाचा समतोल कशा पद्धतीने राखता येईल याबाबत विचारणा करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सोपान काळे यांनी आभार मानले.