सातारा दि. 25 : (जिमाका) : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. या संभाव्य धोक्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी लग्न समारंभ अयोजित करण्याबाबत वधु, वर व मंगल कार्यालय चालकांना खालील प्रमाणे विशेष सुचना निर्गमित केल्या आहेत.
लग्न समारंभाच्या कार्यालयात जास्तीत जास्त 100 व्यक्तींनाच (भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी-वाढपी, इ. सह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे. लग्न समारंभाच्या अगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पोलीस स्टेशन यांचा ना हरकत परवाना घेवून संबंधित तहसिलदार यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. मंगल कार्यालयाच्या परिसरात अथवा ज्या ठिकाणी लग्न कार्य आहे या ठिकाण कोणत्याही प्रकारचे वाद्य अथवा फटाका वाजविण्यास पूर्णपणे मनाई राहील. संपूर्ण लग्न समारंभात वधु व वर या दोन्ही पक्षाकडील आणि उर्वरित सर्व नागरिकांनी पूर्ण वेळ मास्क वापरणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय व्यवस्थापनाने लग्न कार्यालयात पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उलब्ध करुन देणे बंधनकार राहील. लग्न समारंभ बंदिस्त हॉलमध्ये असल्यास व्यवस्थापक यांनी आवश्यक तो सोशल डिस्टंसिंग राहील याबाबत खबरदारी घ्यावी. लग्न समारंभास 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक व कोमॉर्बिड ( मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार इ.) आजारी व्यक्तीस लग्न कार्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात येत आहे. तथापी सख्ख्या रक्त नात्यातील आजी व आजोबा इत्यादींना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. हॉटेल, रिसॉट, लॉन्स, मंगल कार्यालय इ. ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथमवेळी रु. 25 हजार तसेच दुसऱ्यावेळी रु. 1 लाख व फौजदारी कारवाई करण्यात येईल. व संबंधित कार्यक्रम आयोजकाकडून रु. 10 हजार दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.