सातारा, दि. 4 (जिमाका) : सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या. या नावे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय यांचेकडे नोंदणी असलेल्या संस्थेद्वारे राज्यस्तरावरुन मोठ्या प्रमाणावर विविध पदे भरणेबाबत जाहिरात प्रसिध्द झाली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या तपशीलावरुन ही जाहिरात फसवी असून राज्यातील सुशिक्षित तरुणांना प्रलोभन दाखवून त्यांची फसवणुक होण्याची शक्यता आहे.
कृषि आयुक्तालयास प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संबंधितांशी कृषि आयुक्तालय स्तरावरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. संबंधित व्यक्तिस सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या. बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच या महामंडळाचा स्थायी पत्ता व इतर माहिती विचारली असता सदरच्या व्यक्तिने फोन वरील संभाषण मध्येच बंद करुन फोन बंद केला. त्यानंतरही त्यांनी सर्व फोन बंद करुन ठेवलेले असल्याने त्यांचेशी संपर्क होऊ शकत नाही. तसेच त्यांना ई मेलद्वारे माहिती विचारण्यात आली असून अद्याप ई मेलला देखील उत्तर दिलेले नाही.
संबंधित संस्थेच्या जाहिरातीत अथवा संकेतस्थळावर मुख्यालयाचा पत्ता नाही. या जाहिरातमध्ये एकूण 67 हजार 813 पदांची भरती करणार असल्याचे प्रलोभन दाखविण्यात आलेले असून अर्ज भरण्याकरिता शुल्क देखील आकारण्यात आलेले आहे. या सर्व पदांचे वर्षाचे फक्त मानधनावर रु. 975 कोटी एवढे होते. सेंद्रिय शेतमालाची खरेदी व विक्री करण्यासाठी एवढा मानधनावर खर्च करणे निश्चितच व्यवहारिकद्दृष्ट्या संयुक्तिक नाही. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांची मोठ्याप्रमाणवर आर्थिक फसवणुक होण्याची शक्यात नाकारता येत नाही.
सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या, या संस्थेचा आणि केंद्र व राज्य शासनाचा अथवा शासन अंगीकृत महामंडळांशी कोणताही संबंध नाही. तरी अशा फसव्या जाहिरातीस तरुणंनी बळी पडू नये. असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.