निसर्गाचा समतोल राखण्यासाठी " माझी वसुंधरा अभियान " ; वृक्ष लावूया आणि वाढवू या – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

सातारा दि.6 (जिमाका):  वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समोतल बिघडत चाललेला आहे. त्याचे परिणाम आज दिसत आहेत.  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी “माझी वसुंधरा ” या अभियानात सक्रीय सहभाग घेवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन केले पाहिजे पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
    पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने माझी वसुंधरा अभियान राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत रहिमतपूर नगर परिषदेने रहिमतपूर येथील गांधी मैदानावर माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत हरित सायकल महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री श्री. पाटील यांनी मार्गस्त केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  नगराध्यक्ष आनंदा कोरे, तहसीलदार अमोल कदम, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, उपनगराध्यक्षा सुरेखा माने, सुनिल माने, चित्रलेखा माने-कदम आदी उपस्थित होते.
पृथ्वीचे  आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजे तसचे वृक्ष तोड थांबवली पाहिजे,  असे आवाहन करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, बेसुमार वृक्ष तोडीमुळे आज आपण निसर्ग निर्मित अनेक संकटांना सामोरे जात आहे. यापुढे प्रत्येकाने वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लॉस्टीकचा वापरही करु नये. कोरोना संसर्गाचे  संकट काही प्रमाणात दूर झाले असले तरी नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. रहिमतपूर नगर परिषदेने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हरित सायकल महारॅली काढली या रॅलीला त्यांनी शेवटी शुभेच्छा दिल्या.
  पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हिरत सायकल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यातून वृक्ष लागवड व संवर्धन याबाबचे नागरिकांना महत्व पटवून देण्यात येणार असल्याचे रहिमतपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आंनदा कोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी सुनिल माने, चित्रलेखा माने- कदम यांनी माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत काढण्यात आलेल्या हरित सायकल महारॅलीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!