फलटणला देशी खेळाची उज्वल परंपरा, फलटणकर खेळ व खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देतात : श्रीमंत संजीवराजे (बाबा)

    आ.दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व अन्य मान्यवरांचे हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. सौ.दिपालीताई निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
      फलटण दि.६ : फलटण शहराला प्रामुख्याने देशी खेळाची उज्वल परंपरा लाभली असून फलटणकर नेहमीच खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात, त्या पार्श्वभूमीवर अलीकडे बास्केट बॉलसाठी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेले प्रयत्न येथे अन्य खेळांप्रमाणे बास्केट बॉलचे दर्जेदार खेळाडू तयार करण्यास उपयुक्त ठरतील असा विश्वास महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी व्यक्त केला आहे.
     फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मुधोजी क्लब मैदानावर आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे उदघाटन समारंभात विशेष अतिथी म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) बोलत होते. अध्यक्षस्थानी आ.दिपकराव चव्हाण साहेब होते. यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, मा.नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष नितीनभैय्या भोसले, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, मा.नगराध्यक्षा विद्याताई गायकवाड, नगरसेविका सौ.प्रगतीताई कापसे, रणजीतसिंह भोसले, सौ.सोनालीताई बेडके, सौ.सारिकाताई चव्हाण, मोहनराव खलाटे, विवेक शिंदे, प्रतापसिंह निंबाळकर, मा.नगरसेवक चंद्रकांत शिंदे, रणजीतभाऊ निंबाळकर, राहुलभैय्या निंबाळकर, लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालय अध्यक्ष अर्जुन घाडगे, तुषार नाईक निंबाळकर, दादासाहेब चोरमले यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले बास्केट बॉल संघ, शहर व तालुक्यातील खेळाडू, खेळ प्रेमी नागरिक उपस्थित होते.
     विविध देशी, परदेशी खेळांविषयी येथील मुले/मुलींना माहिती व्हावी, त्यातून प्रत्येकाला आपल्या आवडीच्या खेळात सहभागी होऊन खेळता यावे, यासाठी फलटणकर नेहमीच प्रयत्नशील असतात, मुधोजी क्लबच्या माध्यमातून संस्थानकाळापासून विविध खेळांना प्रोत्साहन देताना त्यासाठी आवश्यक साधने सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अविरत सुरु असतो, किशोरसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून येथे बास्केट बॉल साठी सुरु केलेले प्रयत्न उपयुक्त ठरत असून त्या खेळातील दर्जेदार खेळाडू येथे तयार होत असल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी समाधान व्यक्त केले.
     राज्यस्तरीय ओपन बास्केट बॉल स्पर्धांच्या निमित्ताने येथे राज्याच्या विविध भागातून दाखल झालेल्या खेळाडूंमुळे फलटणकरांना दर्जेदार खेळ पाहण्याची संधी मिळेल, त्याच बरोबर येथील खेळाडू त्यातून नवे काही शिकतील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच येथील खेळाडूही कमी नाहीत याची ग्वाही देत परगावच्या खेळाडूंसह फलटण करांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केले.
     अध्यक्षीय भाषणात आ.दिपकराव चव्हाण साहेब यांनी स्पर्धेसाठी दाखल झालेल्या राज्यातील खेळाडूंचे स्वागत करतानाच या खेळाडूंसह स्थानिक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. फुटबॉल, हॉकीनंतर त्याच धर्तीचा हा अत्यंत वेगवान खेळ असल्याचे नमूद केले. खो-खोचे राज्याध्यक्ष या नात्याने राज्यभर खो-खो खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा श्रीमंत संजीवराजे यांचा सतत प्रयत्न असतो त्याच बरोबर फलटण एज्युकेशन सोसायटी, मुधोजी क्लब व अन्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी सतत विविध खेळांना प्रोत्साहन देत विविध खेळातील दर्जेदार खेळाडू येथे निर्माण झाले पाहिजेत यासाठी सतत प्रयत्न, मार्गदर्शन आणि साधने सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य दिल्याचे आ.दिपकराव चव्हाण साहेब यांनी निदर्शनास आणून दिले.
      प्रारंभी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. या स्पर्धातील विजेत्या प्रथम क्रमांकास २१ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये रोख, तृतीय क्रमांकास ११ रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, त्याशिवाय वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार असल्याचे नमूद करीत या स्पर्धांचे आयोजन व नियोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या 
     
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!