सातारा दि. 30 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा , निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (गरीबी निर्मुलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी) योजना 2015 व सार्वजनिक उपयोगिता सेवा आणि केंद्र व राज्य सरकाराच्या योजनांबाबत विधी जागरुकता शिबीर संपन्न झाले.
यावेळी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तृप्ती जाधव, विस्तार अधिकारी काकडे, कोरेगांव बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जे. व्ही. कापडे, गट विकास अधिकारी श्रीमती सुवर्णा चव्हाण उपस्थित होते.
सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तृप्ती जाधव यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (गरीबी निर्मुलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी) योजना 2015 याबाबत प्राधिकरणाच्या माध्यमातून बालिका व महिलांना कोणत्या प्रकारचे लाभ मिळतात या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ मिळवताना काही अडचणी आल्यास विधी सेवा प्राधिकारणाकडे अर्ज देवून मदत घेण्याबाबत आवाहन केले.
यावेळी कोविड-19 लॉकडाऊन कालावधीमध्ये गावामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, ग्रामसेवक व प्रशासक यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला.