खोडजाईवाडी तलावामुळे परिसराचा विकास होईल – सभापती रामराजे नाईक निंबाळकर


सातारा दि. 30 (जिमाका) : खोडजाईवाडी येथे झालेल्या साठवण तलावामुळे येथील परिसराचा विकास झाला आहे. ज्यांनी या साठवण तलावाला जमिन दिली आहे. त्यांचे अभिनंदन करुन येथील पाण्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो उपयोग करावा असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
साठवण तलावाचे भूसंपादन निधीचे वितरण व विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन विधान परिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे,  क्रिडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभपती  प्रणव ताटे, सुनिल माने, प्रभाकर देशमुख, जसराज पाटील, तानाजी साळुंके, अजित पाटील, संगीता साळुंके उपस्थित होते.
पाण्यामुळे कृषी व औद्योगिक क्रांती  प्रगती होती. आज  शेतकऱ्यांच्या त्यागातून जिल्ह्यात अनेक धरणे झाले आहेत. त्यांचे स्मरण  लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी व जनतेने ठेवले पाहिजे. खोडजाईवाडी  येथील शेतकऱ्यांना आज भूसंपादनाचा धनादेश मिळत आहे. या पैशाचा सदुपयोग आपल्या बरोबर आपल्या पुढच्या पिढीसाठी करावा असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, खोडजाईवाडी येथील साठवण तालावाचे काम चांगले झाले असुन यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यावर चेहऱ्यावर सुध्दा आज आनंद दिसत आहे. याच परिसरात ओढाजोड प्रकल्पही राबविण्यात आला होता. त्याचा आज परिणाम चांगला दिसत असून येथील ऊसाचे क्षेत्र वाढले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. पण मार्केट कमिट्या सुरु ठेवून शेतकरी व ग्राहकांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली. आज कोरोनाचे पॉझिटिव्ह रेट कमी झाला असला तरी धोका आणखी टळलेला नाही. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प  आणि विविध विकास कामे पूर्ण करण्यावर शासनाचा भर असून, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधीची मागणी केली आहे. यातून जिल्ह्याचा विकास केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
  या वेळी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना धनादेश मिळाला आहे. त्यांनी मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करावा.  साठवण तलावामुळे खोडजाईवाडी परिसराचे परिवर्तन झाले असून, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असेही त्यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा खोडजाईवाडी ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कारही करण्यात आला. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!