जळोची (फलटण टुडे वृत्तसेवा ):
पारंपारिक पद्धतीला फाटा देत बारामतीमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शिवधर्म पद्धतीने शिवविवाह पार पडला. संभाजी ब्रिगेडचे बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे आणि मधुरा निंबाळकर यांचा ‘शिवविवाह संस्कार’ बारामती येथे झाला. यावेळी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.
महासम्राट बळीराजाचे पुजन करून लग्नाला विवाहसोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या मध्ये रुखवत नाही त्याच प्रमाणे लग्नापूर्वी हुंडा देणे नाही तर
बळीराजा व शिव पुजनानंतर मराठा सेवा संघचे बारामती तालुका अध्यक्ष प्रा.गोविंद वाघ यांनी जिजाऊ वंदना गायली. व भगवान महाराज बागल यांनी पारंपारिक मंगलाष्टकांऐवजी शिवपंचके म्हटली. त्यानंतर वधु-वरांनी शिवशपथ घेतली.
या विवाहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, वराला वधुच्या डाव्या बाजूस बसवण्यात येऊन मातृसत्ताक पद्धतीचा आदर व्यक्त करण्यात आला. मराठा सेवा संघाचे भगवान महाराज बागल यांनी शिवविवाह संदर्भात उपस्थितांना शिवविवाहाचे महत्त्व सांगीतले.
वधु-वरांवर तांदूळाच्या अक्षदा न फेकता फुलांच्या अक्षदा टाकण्यात आल्या. वरात, लग्नपत्रिका, मानपान, सत्कारावरील खर्चाला फाटा देत बहुजन महापुरुषांच्या चरित्राची पुस्तके वाटण्यात आली. या शिवविवाहाला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सुत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले. बारामती परिसरात या आगळ्या वेगळ्या शिवविवाहाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे