फलटण दि.२५ : “ट्रस्ट डेअरी” या नावाने डच कंपनी सोलीडरीडेड व नुट्रेको, अग्रिकल्चरल डेव्हलेपमेंट ट्रस्ट बारामती आणि गोविंद डेअरी फलटण यांनी एकत्र येऊन दूग्ध व्यवसाय व दुध उत्पादक शेतकरी विकासाची योजना तयार केली असून याबबातचा सामंजस्य करार नुकताच बारामती येथे करण्यात आला.
माजी केंद्रीय कृषीमंत्री मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत सदर सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या, यावेळी उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, मा.ना.जयंत पाटील साहेब, कृषिमंत्री मा.ना.दादासाहेब भुसे, मा.खा.सुप्रियाताई सुळे, मा.श्री.राजेंद्रदादा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
गोविंद मिल्कच्या वतीने गोविंद डेअरीचे संचालक मा.श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी या करारावर सही केली.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सने सुरुवाती पासून पशू पालकांच्या हिताचे व विकासाचे काम केले असून आधुनिक तंत्रज्ञान कमी खर्चात पशू पालकांपर्यंत पोहोचवुन त्यांचे उत्पन्न वाढावे, कामकाज कमी व्हावे, दुध उत्पादनाचा खर्च कमी असावा व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम केले आहे. यामध्ये प्रामुख्याने कमी खर्चाचा व अधिक फायद्याचा मुक्तसंचार गोठा, वर्षभर हिरव्या चाऱ्याची साठवण करुन ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा व कमी खर्चात मुरघास कसा तयार करावा याबाबतचे तंत्रज्ञान, कमी पाण्यात माती विरहीत चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञान, जनावरांच्या आजारावर घरच्या घरी उपचार करण्यासाठी “गोविंद होम हर्बल गार्डन” अशा विविध योजना प्रभावीपणे राबवून पशू पालकांच्या जीवनात आनंदी सुप्रभात निर्माण करण्यात उज्वल यश प्राप्त केल्याचे यावेळी मा.श्रीमंत सत्त्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी निदर्शनास आणून दिले.
ट्रस्ट डेअरी या प्रकल्पामुळे प्रामुख्याने पुणे व सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दुग्धव्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रगत देशातील तज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याद्वारे कमी खर्चात अधिक दूध उत्पादन ही संकल्पना साकारुन अधिक फायदेशीर व शाश्वत दूग्ध व्यवसाय साकारण्यासाठी मदत होणार आहे.