फलटण ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
महाराष्ट्राच्या वतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी ७२व्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२१) रोजी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे.
वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवत समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे. समाजाला विठ्ठल भक्ती शिकवली आहे. हीच संतपरंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मूर्ती समोर ‘श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शवण्यात आला आहे.
चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे प्रत्येकी ८ फूट उंचीचे फिरते पुतळे आहेत.
या चित्ररथावरील राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणाऱ्या भगवान श्री विठ्ठलाची कटेवर हात असणारी ८.५ फूट उंचीची राजस, सुकुमार मूर्ती अवतरली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात ८ फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे. यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत.