शिधापत्रिकेला लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्यास 1 फेब्रुवारीपासून* *सार्वजनिक व्यवस्थेवरील मिळणारे धान्य होणार बंद

*

 

सातारा दि.21 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणा-या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक सिडींग करण्यासाठी अंतिम मुदत  ३१ जानेवारी २०२१ ही देण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक या मुदतीत लिंक होणार नाहीत त्यांना  १ फेब्रुवारी २०२१ पासून सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणा-या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक सिडींग १०० % पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष मोहिम राबविणेचे निर्देश शासनस्तरावरुन देणेत आलेले आहेत.

लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून रास्तभाव दुकानांतील ई-पॉस मशिनमधील ई-केवायसी व मोबाईल लिंकींग सुविधेचा वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक लिंक करता येणार आहे. त्यासाठी सातारा जिल्हयातील एकूण 1679 रास्तभाव दुकानांतून ही व्यवस्था उपलब्ध करुन देणेत आली आहे व त्याबाबतचे प्रशिक्षणही रास्तभाव दुकानदार यांना संबंधीत तालुक्याचे पुरवठा शाखेमार्फत अलाहिदा देण्यात आलेले आहे.

सातारा जिल्हयात एकूण 18,28, 257 लाभार्थ्यांपैकी अदयापि 3,03,262  इतक्या लाभार्थ्यांचे आधार सिडींग झालेले नाही. त्यापैकी जे लाभार्थी दुबार, मयत, स्थलांतरीत आहेत किंवा ज्या मुली विवाहीत असूनही त्यांची नावे मुळच्या शिधापत्रिकेवर तशीच राहिली आहेत त्यांचेसाठी विशेष मोहिम राबवून त्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना अधिनस्त सर्व तहसिलदार यांना अलाहिदा देणेत आलेल्या आहेत.

केवळ आधार सिडींग न झालेमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घेणा-या ज्या लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अदयापही लिंक झालेले नाहीत त्यांनी त्यांचे रास्तभाव दुकानदारांकडे आधारकार्डची छायांकीत प्रत व अंगठा (थंब) दयावा व आधार सिडींग त्वरीत करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!