बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
बारामती स्पोर्ट्स फौंडेशनचे कार्य हे बारामतीच्या वैभवात टाकणारे आहे असे प्रतिपादन खासदार श्री. शरद पवार यांनी केले . आर्यनमॅन सतिश ननवरे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या बारामती स्पोर्ट्स फौंडेशनच्या सदस्यांनी आज गोविंद बाग येथे श्री. पवार यांची भेट घेतली . त्यावेळी श्री. पवार यांनी फौंडेशनच्या सदस्यांबरोबर मनमोकळा संवाद साधला .
पवार म्हणाले , बारामतीला आम्ही नेहमीच शैक्षणिक , प्रशासकीय , कृषी , कला आणि क्रीडा या बाबतीत आघाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला पण , समाजात व्यापक प्रमाणात क्रीडा संस्कृती रुजवायची असेल तर , लोकसहभाग आणि लोकचळवळ उभारण्याशिवाय गत्यंतर नाही . बारामती मध्ये क्रीडा संस्कृती रुजवून हीच नेमकी पोकळी भरून काढण्याचे काम आर्यनमॅन सतिश ननवरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे . वय वर्षे 8 ते 65 वयोगटातील लोक फौंडेशनचे सदस्य असल्याने खऱ्या अर्थाने बारामती स्पोर्ट्स फौंडेशन सगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे पवार म्हणाले .
फौंडेशनच्या बारामती-शिवनेरी-बारामती या 390 किमी सायकल राईड चा संदर्भ घेऊन पवार यांनी महाराष्ट्रराज्य स्थापना दिवशी दि. 1 मे 1960 रोजी कॉलेज जीवनात पुणे ते शिवनेरी या त्यांनी केलेल्या सायकल प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला . इथून पुढे
यावेळी श्री. ननवरे यांनी फौंडेशनचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवरायांचे 350 किल्ले सायकल राईड करून पूर्ण करण्याचे व त्याद्वारे स्वराज्याचा ज्वलंत इतिहास नामवंत इतिहासतज्ञ व शिवव्याखाते यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढी पर्यंत पोहोचवणे या मोहिमेची माहिती दिली . फौंडेशनचे मुख्य ध्येय हे सुदृढ व सक्षम तरुणपिढी तयार करण्याचे असून त्याचद्वारे बारामती मधील पाहिले ऑलम्पिक मेडल मिळवणे हे असल्याचे श्री. ननवरे यांनी सांगितले , त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑलम्पिक दर्जाच्या सुविधा जसे की , 50 मीटर स्विमिंग टॅन्क , 400 मीटर सिंथेटिक रनिंग ट्रॅक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोचिंग सेंटर आदी मागण्या यावेळी फौंडेशनच्या सदस्यांनी केल्या या विषयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह स्वतः बारामती मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सोयीसुविधा आणण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे श्री . पवार यांनी सांगितले .