फलटण दि.१६ : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३ टप्प्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी, कामगार व पोलीस आणि तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील सर्व नागरिक व ५० वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणून देत कोरोनाचे संकट लवकर जावू दे अशी प्रार्थना मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब यांनी केली.
कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब बोलत होते. मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते शनिवार दि.१६ रोजी येथील उप जिल्हा रुग्णालयात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी मा.डॉ.शिवाजीराव जगताप, उप जिल्हा रुग्णालय अधिक्षक मा.डॉ.व्यंकट धवन, तालुका वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.आर.एम.जगदाळे, वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.अंशुमन धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी, वर्ग ३ व ४ चे कर्मचारी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण शुभारंभ करण्यात आला असून काही दिवस येथे नियोजनानुसार लसीकरण करण्यात येणार आहे त्यानंतर तालुक्यातील सर्व प्रा.आरोग्य केंद्रांपैकी ठराविक बुथवर आगामी काळात लसीकरण करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणून देत प्रारंभी दररोज सुमारे १०० जणांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे उप जिल्हा रुग्णालय अधिक्षक मा.डॉ.व्यंकट धवन यांनी सांगितले.
फलटण तालुक्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट कडून “कोविशील्ड” लसीचे २००० डोस उपलब्ध झाले आहेत. फलटण तालुक्यातील ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसींसाठी नोंदणी केली आहे, त्यांना प्रारंभी लस उपलब्ध होणार आहे. या मोहिमेसाठी फलटण उप जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे मा.डॉ.व्यंकट धवन यांनी सांगितले.
प्रारंभी तालुका वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.आर.एम.जगदाळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली.