भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.पतंगराव कदम यांची 76 व्या जयंती साजरी

फलटण : ‘‘भारती विद्यापीठासारखी उच्च दर्जाची शिक्षण संस्था पुण्यात उभी करुन नागरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम डॉ.पतंगराव कदम यांनी केले. त्यातून महाराष्ट्राचे नाव देशात व परदेशात मोठे झाले. आजच्या राजकारणात त्यांची उणीव भासते हेच त्यांचे मोठे राजकीय कर्तृत्त्व आहे. कोट्यावधी लोकांचा, लाखो विद्यार्थ्यांचा पोशिंदा म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे’’, अते प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी केले.
महात्मा एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.पतंगराव कदम यांच्या 76 व्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन सुभाषराव शिंदे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक रविंद्र बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सुभाषराव शिंदे व रविंद्र बेडकिहाळ यांनी डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
‘‘सर्व पक्षात पतंगरावांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे सर्वांशी त्यांचे वागणे दिलखुलास होते. देशाचे ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांचेशीही त्यांचे अतूट, असे विश्‍वासाचे दृढ नाते होते. आज ते असते तर शरद पवार व पतंगराव यांच्यामुळे महाराष्ट्राचे आजचे राजकीय चित्र अधिक उठावदार झाले असते’’, असेही सुभाषराव शिंदे यांनी नमूद केले.
डॉ.पतंगराव कदम यांच्या अलौकिक नेतृत्त्वाचे अनेक पैलू सांगताना रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘शिक्षण, सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी काम करताना सामान्य कार्यकर्त्यांशी जुने असणारे संबंध मैत्रीतून जपले हे त्यांचे आदर्श असे स्वभाववैशिष्ठ्य आहे. आपल्या संस्था, राजकारण, सहकार व सत्ता या गरजू लोकांसाठी आधार आहेत याची त्यांना जाणीव होती. आंतरराष्ट्रीय कीर्तीची भारती विद्यापीठ शिक्षण संस्था व कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था हा त्यांचा श्‍वास होता. या संस्थांतून त्यांनी हजारो, लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणातून स्वावलंबी बनवले व उत्तम तर्‍हेने जगण्याची संधी दिली; हे त्यांचे फार मोठे संचित आहे.’’
कार्यक्रमास श्रीराम विद्याभवन मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक सचिन भुजबळ, भिवा जगताप, अरुण खरात, विशाल मुळीक, अशोक सस्ते यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे सदस्य उपस्थित होते. मसाप फलटण शाखेचे कार्यवाह अमर शेंडे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांना जयंतीदिनी अभिवादन करताना सुभाषराव शिंदे, रविंद्र बेडकिहाळ व उपस्थित मान्यवर.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!