कोळकीच्या विकासासाठी अनेक महत्त्वकांक्षी योजना राबवणार; राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निर्धार; जनतेने साथ देण्याचे आवाहन
कोळकी गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, बंदिस्त गटार योजना अशा महत्त्वकांक्षी योजना कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाच्या वतीने ह्या पूर्वीच राबविण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी मतदारराजाने साथ द्यावी, असे आवाहन प्रभाग 6 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौ. राधिका अशोक पखाले, सौ. तेजश्री अशोक मुळीक आणि तुषार जगदेवराव नाईक-निंबाळकर यांनी केलेले आहे.
फलटण तालुक्यातील कोळकी गावात सध्या ग्रामंपचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग 6 मधून राष्ट्रवादीच्या सौ. राधिका पखाले, सौ. तेजश्री मुळीक आणि तुषार नाईक निंबाळकर हे निवडणूक लढवत आहेत.कोळकी गावात विकासकामांचा अजेंडा घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मतदारांसमोर जात असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यांसदर्भात उमेदवारांशी संवाद साधला ते म्हणाले, तालुक्यातील कोळकीचा सर्वांगीण विकास राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे होत आहे. मात्र, हा विकास विरोधकांच्या नजरेत खुपत आहे.तथापि, कोळकीचा हा विकासरथ आम्ही जनतेच्या आशिर्वादाने पुढे नेणार आहोत.
कोळकी गाव हे फलटणशेजारी असल्याने भविष्यात याठिकाणी लोकसंख्या वाढणार आहे.ही दूरदृष्टी ठेवून कोळकीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, बंदिस्त गटार योजना अशा महत्त्वकांक्षी योजना या पूर्वीच कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक वार्डात अंतर्गत रस्ते, डांबरीकरण व काँक्रिटीकरण, गार्डन विकसीत करणे, समाजमंदीर व मंदिराचा विकास अशी विविध कामेही मार्गी लावणार आहोत.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा भक्कम पाठिंबा असल्याने गावात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणता येणार आहे.
कोळकी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेने आशिर्वाद द्यावा, असे आवाहनही सौ. राधिका पखाले, सौ. तेजश्री मुळीक आणि तुषार नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.