सातारा दि.24 (जिमाका): शिक्षक व पदवीधर निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खरबदारी घेण्यात आली असून मतदारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे उपस्थित होत्या.
सातारा जिल्ह्यात शिक्षक मतदार 7 हजार 711 तर पदविधर 59 हजार 71 मतदार आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, शिक्षक मतदार संघासाठी 44 तर पदविधर मतदार संघासाठी 132 असे एकूण 176 मतदान केंद्र आहेत. 1 हजार 276 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून 201 आरोग्य कर्मचाऱ्यांचीही मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व मतदार अधिकारी यांच्यासाठी एन-95 मास्क, ग्लोज व थर्मल गन त्याचप्रमाणे सॅनिटायझर पुरवठा करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
आपले मतदार यादीतील नाव लिंकवर शोधता येईल
शिक्षक व पदवीधर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने https://ceo.maharashtra.gov.
बोगस मतदार आढळल्यास होणार कारवाई
शिक्षक मतदार यादीत शिक्षक नसताना सुद्धा अवैध कागदपत्र देऊन नोंदणी केली असल्याचे आढळ्यास संबंधितावर निवडणूक आयोगाच्या सूचने प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह पत्रकार परिषदेत सांगितले.
मतदानासाठी पुढीलप्रमाणे पुरावे ग्राह्य धरण्यात येतील : आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज संस्था यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विश्व विद्यालयाद्वारे वितरीत पदवीधर, पदविका मुळ प्रमाणपत्र व सक्षम प्राधिकाराद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र.