सातारा : सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा शाळेत इयत्ता पाचवीत शिकणारा बाल चित्रकार आशुतोष अवधूत फडणीस या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे .
.भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती.देशात साजरा झालेल्या बिग बटरफ्लाय सप्टेंबर महिन्यानिमित्त राज्यस्तरीय फुलपाखरू स्पर्धा घेण्यात आली होती .या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या लहान गटांमध्ये महाराष्ट्रातून शेकडो बाल चित्रकारांनी आपली चित्रे सादर केली होती .अगदी सातासमुद्रापलीकडे म्हणजे अमेरिकेतून देखील या स्पर्धेसाठी फुलपाखरू या विषयावरील चित्र सहभागी झाले होते . या चित्रकला स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील 73 वर्षीय सुमन संपत जाधव यांनीही सहभाग घेतला होता तर अमेरिकेच्या कोलोरॅडो शहरातील मराठमोळी मुलगी पूजा टोपरे हिने ही सहभाग घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या स्पर्धेसाठी न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते .या स्पर्धेत इयत्ता पाचवीतील आशुतोष अवधूत फडणीस याला संस्थेमार्फत प्रमाणपत्र व रोख रक्कम पाचशे रुपये देऊन गौरविण्यात आले आशुतोष याला न्यू इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक घनश्याम नवले आणि संदीप माळी यांनी मार्गदर्शन केले होते .या यशाबद्दल आशुतोष चे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नवले ,सर्व पर्यवेक्षक तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन करून त्याच्या या कलेला भविष्यात अधिक यश मिळू अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.