बारामती (फलटण टुडे) : आजच्या जगात प्रामाणिकपणा या गोष्टी विरळ होत असताना अजूनही जगात प्रामाणिक लोक आहेत. याची प्रचिती उंडवडी कडेपठार येथील शेतकरी संतोष जराड यांच्या रुपाने बुधवारी (ता. 28) रात्री आली. त्याला निमित्त होते. रस्त्यावर सापडलेली पाऊण लाख रुपये किमंतीची सोन्याची कर्ण फुले असलेली पिशवी. संतोष जराड यांनी प्रामाणिकपणे ही पिशवी दागिण्यांसह मूळ मालकाला परत केली. त्यामुळे जराड यांचा समाजात एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.
खराडेवाडी येथील शेतकरी नामदेव तुकाराम भापकर हे बुधवारी(ता. 28) ते त्यांच्या पत्नीला सोन्याची कर्ण फुले आणण्यासाठी बारामतीला गेले होते. कर्ण फुले घेवून ते सायंकाळी सहाच्या दरम्यान दुचाकीवरुन बारामती- पाटस रस्त्याने घराकडे परतत असताना उंडवडी कडेपठारच्या हद्दीत आल्यानंतर रस्त्यावरील एका खड्यात त्यांची दुचाकी आदळली. त्यांच्या दुचाकीच्या डिगीतील छोटीशी पिशवी खड्यात पडली. या पिशवीत 79 हजार रुपये किमंतीचा दागिना होता. यावेळी उंडवडी कडेपठार येथील शेतकरी संतोष जयसिंग जराड यांना ती पिशवी सापडली. पिशवीत सोन्याची दीड तोळे असलेली दोन सोन्याची कर्ण फुले व खरेदीचे बिल होते. खरेदी बिलावर नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर देखील होता.
संतोष जराड यांनी लगेच, त्या बिलावरील मोबाईलवरुन भापकर यांना फोन करुन पिशवी सापडल्याची कल्पना दिली. तो पर्यंत भापकर आणि त्यांची पत्नी पिशवी हरविल्यामुळे हतबल झाले होते. जराड यांनी घरी बोलावून भापकर पती- पत्नीकडे सापडलेली दागिन्याची पिशवी मोठ्या आनंदाने परत केली. यावेळी भापकर दापंत्याच्या डोळ्यात आनंद अश्रू अनावर झाले. संतोष जराड यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.