दिव्यांग व्यक्तिंना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची यादी प्रसिध्द



सातारा दि.26 (जिमाका) :  शासकीय अथवा खाजगी स्वरुपाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना जुळवाजुळव करावी लागते. बऱ्याचदा कागदपत्र हाताळताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी केंद्रिय स्तरावर एक ओळखपत्र असणारे हे युडिआयडी कार्ड कायदेशीर ठरणार आहे. या कार्डमध्ये दिव्यांग व्यक्तींची संपूर्ण माहिती असून देशपातळीवरुन युनिक आ डी क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर अपंगत्वाचा प्रकार अपंगत्वाचे प्रमाण नमुद आहे.
वैश्विक ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी www.swavlambancard.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरावी. यासाठी अपंगत्वाचा ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त केलेला वैद्यकीय दाखला, आधारकार्ड, जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी दाखला, फोटो इ. कागदपत्रे सादर करावी. सदर अर्जातील वैदयकीय दाखला व माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्याकडून ऑनलाईन पडताळणी होवून अर्ज ऑनलाईन केंद्र शासनाकडे सादर होत आहे. यानंतर सदरचे ओळखपत्र जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेकडे टपालाद्वारे साधारणत: दोन ते तीन महिन्याच्या कालावधीनंतर उपलब्ध होईल. सदर उपलब्ध झालेले वैश्विक ओळखपत्र दिव्यांग व्यक्तींना तालुका स्तरावरुन वाटप करण्यात येईल.
दिव्यांग योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा फायदा होणार आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील एकूण दिव्यांगांची माहिती उपलब्ध होणार आहे. सातारा जिल्ह्यात दिव्यांग बांधवांनी वैश्विक ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज केलेले असून अद्यापर्यत एकूण समाज कल्याण विभागाकडे एकूण 414 ओळखपत्र केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहेत.
दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी विनय गौडा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या  हस्ते सुधीर आखाडे, सातारा (अस्थिव्यंग), विनोद कापले, कोडोली (कर्णबधीर), शांताराम जाधव (कर्णबधीर), समीर कांबळे (अस्थिव्यंग), गायत्री शहा (अस्थिव्यंग) या उपस्थितीत दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र प्रतिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय न्यास कायदा 1999 अन्वये मतिमंद दिव्यांगाचो पालकांनी कायदेशिर पालकत्वासाठी अर्ज केलेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे 68 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर कायदेशीर पालकत्वाचे प्रतिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आलेले आहे. या वेळेस फादर थॉमस थडशिल व फादर अनिष जोसेफ परमप्रसाद चॅरिटेबल सोसायटी आशभवन, कोडोली, सातारा यांना अनाथ पालकाचे कायदेशीर पालकत्व स्विकारल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उर्वरित कायदेशीर प्रमाणपत्र समाजकल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील उर्वरित दिव्यांगांना ओळखपत्र संबंधित तालुक्यांचे गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे कार्यालयातील व समग्र शिक्षा अभियानात समावेशित शिक्षण विभागाकडून वाटप करण्यात येणार आहेत. तेव्हा वाटप करावयाचे ओळखपत्राबाबत दिव्यांगांची यादी पंचायत समिती कार्यालयात फलकावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीतील दिव्यांगांनी वैश्विक ओळखपत्र गट विकास अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करुन घेणेबाबत आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, संजय शिंदे यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!